साताऱ्यातील खंड्या धाराशिवकरच्या टोळीला “मोका’

सातारा – खाजगी सावकारीद्वारे दहशत निर्माण करुन लाखो रुपयांची माया गोळा करणाऱ्या खंड्या ऊर्फ प्रमोद बाळासाहेब धाराशिवकर याच्यासह त्याच्या दहा साथीदारांना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने मोका लावण्यात आला.

जिल्हा पोलिसांनी उचललेल्या या कठोर पाऊलाचे साताऱ्यात स्वागत होत आहे. खंड्या वय 35, रा. न्यु विकास नगर, खेड हा स्वत:च्या आणि टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गर्दी, मारामारी, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दरोडा, अपहरण, खंडणी, मालमत्तेचे नुकसान असे 22 गुन्हे त्याच्यावर दाखल होते. सातारा जिल्ह्यातील गरजू लोकांना विनापरवाना 15 ते 20 टक्‍के व्याजाने मोठ्या रक्‍कमा देऊन त्याच्या वसुलीसाठी टोळीद्वारे तो दहशत निर्माण करत होता. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार खंड्या आणि त्याच्या टोळीतील दहा सदस्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकीच्या निमित्ताने गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमाद्वारे प्रमोद धाराशिवकर आणि त्याच्या 10 साथीदारांवर पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्फत प्रस्ताव पाठविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी या प्रस्तावाची छानणी करुन तो कोल्हापुर परीक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या मोका प्रस्तावास नांगरे पाटील यांनी मान्यता दिली.

सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे करत आहेत. आगामी काळात खंडया धाराशिवकर आणि त्याच्या साथीदारांकडून अनधिकृतपणे जमवण्यात आलेल्या जमिनी, फ्लॅट, बंगलो फ्लॅट, टु व्हिलर, फोर व्हिलर अशा स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात येणा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)