साताऱ्यातील उद्योजकाची 80 लाखांची फसवणूक

 

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी)
परकीय गुंतवणूकीचे 125 कोटीचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील एका उद्योजकाची तब्बल 80 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेंगलोर येथील एका व्यक्तीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रसन्न आनंदराव देशमुख (रा. कामाठीपुरा पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. श्रीनिवास सत्यनारायण मधीमधी (रा. बेंगलोर), अजित गायकवाड (रा. वेळे, ता. वाई, सध्या रा. ठाणे) बिलाल (पुर्ण नाव माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रसन्न आनंदराव देशमुख (रा. कामाठीपुरा पेठ, सातारा) यांची स्वत:ची कंपनी आहे. मुंबई येथे फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कंपनीचे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी तेथे अजित गायकवाड यांची ओळख झाली. दरम्यान गायकवाड याने बेंगलोर येथील श्रीनिवासची ओळख करून दिली. ही ओळख करून देताना श्रीनिवास हे परकीय गुंतवणुकीचे आर्थिक कर्ज देण्याच्या क्षेत्रात काम करतात, असे सांगितले.

त्यामुळे देशमुख यांचा विश्वास बसला. त्यानंतर देशमुख यांना संशयितांनी ईमेल आयडी दिला व त्यावर देशमुख यांच्या कंपनीची कागदपत्रे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधितांनी खोटी कागदपत्रे तयार करून प्रसन्न देशमुख यांच्याकडून 80 लाख रुपये घेतले. ही रक्कम घेताना संबंधितांनी हसीना एन्टरप्राईजेस यांच्या ऍक्‍सीस बॅंकेच्या कागदपत्रांसाठी पैसे लाणार आहेत, असे सांगितले होते.

त्यामुळे देशमुख यांनी संबंधितांच्या अकाऊंटवर 80 लाख रुपये पाठविले. त्यानंतर संबंधितांनी देशमुख यांच्यांशी कोणताही संपर्क ठेवला नसल्याने फसवणूक झाल्याचे देशमुख यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)