साताऱ्याच्या होमपीचवर उदयनराजेंची पुन्हा मोर्चेबांधणी

संग्रहित छायाचित्र

लोकसभा मतदारसंघात भिरकिट सुरु; राष्ट्रवादी विरोधी गटाच्या राजकीय बेरजेचा प्रयत्न

सातारा –
सातारा लोकसभेची राजकीय समीकरणे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने टोकदार संघर्षाकडे निघाली आहेत. भाजप सध्या वेट अँड वॉचच्या तयारीत असले तरी राष्ट्रवादी व स्वतः उदयनराजे यांच्यासाठी लोकसभेची लढाई आता आरपारची ठरली आहे. शरद पवारांचे राजकीय कसब की उदयनराजे यांचे उपद्रवमूल्य हा प्रश्‍न निर्णायक ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा पिंजून काढायला सुरूवात केल्याने राष्ट्रवादीच्या गोटाची चलबिचल वाढली आहे.

छत्रपती शिवरायांना त्यांच्या वाटचालीत परकीयांपेक्षा स्वकियांशी प्रचंड संघर्ष करावा लागला तोच वारसा पुढे उदयनराजे यांच्या वाट्याला आला आहे. भाजपसह बहुतांश राजकीय पक्षांची थेट ऑफर असताना राष्ट्रवादीतच असणाऱ्या उदयनराजे ना स्वकियांशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. याला स्थानिक राजकारणाचे बरेच कंगोरे आहेत. जिल्हा बॅंकेची निवडणूक असो की विधानपरिषद निवडणूक किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती राष्ट्रवादीला फाट्यावर मारण्याची एकपण संधी उदयनराजे यांनी सोडली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेखर गोरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेला दगाफटका खुद्द अजितदादा पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यामागे कॉंग्रेसला हाताशी धरून कोणी सूत्रे फिरवली याचा हिशोब राष्ट्रवादीने आपल्या खात्यात आजही जमा ठेवला आहे. विरोधी मित्रपक्षांची मोठी फौज बाळगणाऱ्या उदयनराजेंच्या बेभरवशी राजकारणाची सल राष्ट्रवादीला पर्यायाने विधान परिषद सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांना आहे आणि प्रत्येक वेळा बारामती व्हाया फलटण अशी हलणारी राजकीय समीकरणे याची सल उदयनराजे यांना आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत राष्ट्रवादीची प्रचंड पडझड होत असताना सातारा जिल्ह्याने पक्षाचा आबं राखला आणि साडेतीन लाखांच्या मताधिक्‍याने उदयनराजे यांनी दिल्ली गाठली होती. उदयनराजे यांचे आक्रमक राजकीय मेरीट आणि त्यांच्या रांगड्या राजकारणावर फिदा असणार तरुण मतदार यांची पवारांना पूर्ण जाणीव आहे. आणि छत्रपती नावाची बिरुदावली मराठा समाजाचा आक्रमक नेता, त्यामुळे मराठा आरक्षणाची राजकीय समीकरणे या घडामोडीवर उदयनराजे यांना नकार देणे म्हणजे सातारा मतदारसंघात आणखी गुंता वाढवणे, अशी कोणतीही रिस्क पवार सध्या घ्यायला तयार नाहीत.

त्यामुळेच पवारांनी उदयनराजेंना शालजोडीतल्या कानपिचक्‍या देताना अदृश्‍य हाताचा सॉफ्ट कॉर्नर नेहमीच ठेवला आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा लोकसभेसाठी अत्यंत सावध पावले पडताना दिसत आहेत. पण खऱ्या राजकारणाचा थांग शेवटपर्यंत द्यायचा नाही हे सूत्र मात्र दोन्हीकडून कसोशीने पाळले जात आहे. सध्या तरी राष्ट्रवादीच्या गोटात पवारांच्या साक्षीने राजकीय खुंटा बळकट करण्याचा आटापिटा उदयनराजेंचा सुरू आहे. पण दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्याशी राजकीय खलबते करण्याची धूर्त चाल उदयनराजे यांनी खेळली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणाचे पारडे जड यापेक्षा उदयनराजे नक्की कोणाच्या पारड्यात या विषयावर राजकीय सट्टेबाजी सुरू झाली आहे.

उदयनराजेंसाठी आरपारची लढाई
गेल्या दहा वर्षात खासदारकीच्या दोन टर्म पूर्ण करणारे उदयनराजे आता हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. भूमाता गौरव दिंडीची राजकीय कलाटणी उदयनराजेंना थेट पहिल्यांदा दिल्लीला घेउन गेली. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये उदयनराजें यांच्या नावाचा करिष्मा पहायला मिळाला. साडेतीन लाखाचे विक्रमी मताधिक्‍य अव्वल ठरले. मात्र संसदेतील नीचांकी उपस्थिती खासदार निधीचे असमतोल वितरण, स्थानिक आमदारांची नाराजी, राष्ट्रवादी विरोधी अजेंडा यामुळे उदयनराजे यांची मोठी राजकीय अडचण झाली आहे. आठ मतदारसंघातील ठराविक गट वगळले तर सध्यातरी राजकीय वातावरण राजेंच्या विरोधातच आहे. आसपासच्या कार्यकर्त्याचे वर्तुळ तपासण्याचा पवारांचा सल्ला उदयनराजे यांनी मानला नाही. साताऱ्याच्या राजकारणातील अकलूजची लुडबूड अनेकांना पसंत नाही. अशोकाचे झाड फक्‍त स्वतःलाच सावली देते असे प्रस्थ हवयं कशाला ? सोना ऍलॉईज प्रकरणाला 52 दिवसांचा विजनवास कोणीच विसरलेले नाही, असा स्पष्ट सल्ला सातारकरांचा उदयनराजे यांना आहे. सुरूची राडा, वेदांतिका राजे भोसले यांचा पालिका निवडणुकीतील पराभव यामुळे साताऱ्याचे राजकारण ताणण्याच्या पलीकडे गेले आहे. तंबूत मागे सैन्य नाही आणि जे आहे ते अपवाद वगळता कुचकामी आहे ही राजकीय सतर्कता उदयनराजे यांना ठेवावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)