सातारी तुतारी

मधुसूदन पतकी

सातारा शहराचा विकास क्षितिज समांतर सुरु आहे की आकाश समांतर सुरु आहे हे समजत नाही. ग्रेड सेपरेटरमुळे गावाचा विकास होईल तेंव्हा नक्कीच होईल पण सध्या एकूणच सातारा नागरीकरणा संदर्भातील ज्या धोरण लकव्याने सातारकरांना जखडले आहे ते जखडलेपण कधी मोकळे होईल हे समजत नाही. एकमात्र नक्की सेपरेटर मुळे विकासाचा ग्रेट धुराळा उडाला असून लोकसभा निवडणुकी नंतर धुराळा खाली बसल्यावर विकासाचे चित्र स्पष्ट होईल.

या कामासाठी दोन वर्षांची मुदत आहे. या दोन वर्षात दोन निवडणुका आहेत.त्या ही लोकसभा आणि विधानसभेच्या ! सातारा जिल्ह्यात आणि सातारा शहरातही राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. सातारा जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादीचे आहेत तसेच आमदार ही राष्ट्रवादीचेच. आता सेपरेटरचे काम विकासाचे मानले तर हे काम कोणी केले यावर प्रारंभी चुटपुटती श्रेयवाद लढाई झाली. राष्ट्रीय महामार्ग आणि रस्त्यांचे जाळे विणणारे मुळ नागपूरचे स्पायडर मॅन नितीन गडकरी तसेच खा. उदयनराजे भोसले यांचे स्नेहाचे संबंध असल्यामुळे खासदारांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून भूमिपूजन ही पार पडले.

आता लोकसभा निवडणुकीत ग्रेड सेपरेटचे श्रेय राष्ट्रवादी घेणार की भारतीय जनता पक्ष सांगणार हे नक्की होईल. खासदारच पक्ष बदलणार असतील तर प्रश्‍नच मिटेल मात्र त्यांच्यापुढे कोणत्या पक्षातून त्यांनी लढायचे हा प्रश्‍न असेल तर लोकसभेच्या विकास पूर्ततेची घोषणा कोणाची असेल? लोकसभा पुलाच्या मागे सध्या बरेच पाणी साठलेले आहे. या पाण्याचा रंग भगवा आहे की पांढरा, हिरवा , निळा आहे हे अजुन नक्की झालेले नाही मात्र सध्या पारदर्शक असलेले पाणी रंगांच्या छेटे शिवाय वाहणार नाही हे पण नक्की आहे.

या रंगाचे राजकारण बाजुला ठेवले तरी सध्या सातारकर ज्या परिस्थीतीतून जात आहेत ती परिस्थीती फारशी सुखावह नाही. विकासासाठी त्याग केला पाहिजे. काही बाबी सहन ही केल्या पाहिजेत मात्र सहनशक्तीचा अंत पाहिला जाऊ नये एवढीच नाममात्र अपेक्षा सध्या सातारकरांची आहे.रस्ते नाहीत, पार्किंगसाठी जागा नाही.

फुटपाथ कधीच ढिगाऱ्यांच्या उदरात गडप झालेत. त्यावर दुचाकींचे राजरोस राज्य निर्माण झाले. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांच्या दुचाकी गाड्या नेणारी क्रेन गायब झाली आहे. तीचा करार संपला आहे की नगर पालिकेने पार्किंग झोन अद्याप दिले नाहीत, दिले ते योग्य दिले आहेत का असे प्रश्‍न अजून मिटलेले नाहीत.

व्यवस्थापन लकवा मारला गेला तो या मुद्यांवरच. ग्रेड सेपरेटरचे काम जिथे सुरु आहे अशा रस्त्यांच्या बाजुने , कंपनीने लावलेल्या पत्र्यांच्या आडोशाने दुचाकी वाहने कशीबशी जात असताना वाहने ज्या चिंचोळ्या रस्त्याने जातात ते रस्ते खड्डेमुक्त असावे एवढी माफक अपेक्षा आहे.रस्ते खणले जात असताना पर्यायी मार्गांची सोय आणि परिस्थीती योग्य , वाहन चालवण्या सारखी आहे का ?

त्या मार्गांवर वाहतूक कोंडी होणार नाही याची व्यवस्था नगर पालिका आणि संबंधीत खात्यांनी केली आहे का ? लोणार गल्लीतून होणाऱ्या वाहतुकीचे नियंत्रण झाले आहे का ? यासह वाहतुकीची, रस्त्याची, वाहतूक नियंत्रणाची, लोक शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे का ? यावर आता तरी चर्चा आणि कृती व्हायला पाहिजे.

सातारकरांनी ही सगळी जबाबदारी केवळ सरकारी खाते आणि नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेची आहे असे समजणे आता बास करावे. एकपदरी मार्ग केल्यावरही दुचाकी स्वार ज्या पध्दतीने गाड्या चुकीच्या मार्गाने नेतात ,किंवा तिथे नेमलेल्या संबंधितांना अरेरावी करत मार्ग काढतात त्यावर ही चांगला इलाज केला पाहिजे.

सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख हे नियमाच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर आहेत.तशीच सवय सातारकरांना लागली पाहिजे.विकासाची गंगा साताऱ्याच्या ग्रेड सेपरेटरमधून भले वाहु दे पण या गंगेतले पाणी चाखायचे असेल तर शिस्त, नियमितपणा पाहिजे याची दखल आपण घेतलीच पाहिजे.केवळ राजकारण,विकासाची आश्‍वासने आणि निवडणुकीत हवा करून सातारी तुतारी फुंकली तर त्याचा उपयोग होणार नाही.ती पिपाणी वाजवल्या सारखे होईल नाही का ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)