सातारा: 70 नंबर कचराकुंडी जेव्हा हालत होती…

राजे…चॉकलेट नको अन्न द्या
खा.उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यात आज ही चिमुरड्यांना पोट भरण्यासाठी कचराकुंडीचा आधार घ्यावा लागतो ही र्दुदैवाची बाब आहे. खा.उदयनराजे यांचे लहान मुलांविषयी असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. ते मुडमध्ये असले अन एखादे लहान मुल त्यांना भेटले तर ते आवर्जुन खिशातील चॉकलेट काढून मुलांना देतात. मात्र, आता राधिकारोड सह परिसरात अन्नासाठी वणवन हिंडणाऱ्या मुलांसाठी चॉकलेट नव्हे तर दोन वेळच्या अन्नाची कायदेशीर सोय करण्याची जबाबदारी त्यांना खासदार व राजे म्हणून देखील घ्यावी लागणार आहे.

सम्राट गायकवाड

बालकामगार निषेधदिनावर लहानग्या कचरावेचकांचे सावट

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा – राधिका रोड, सातारा. वेळ सायंकाळी 5 ची. रस्त्याच्याकडेची पालिकेची कचराकुंडी हालत होती.अनेकांना वाटले की एखादे भुके जनावर अन्नाच्या शोधासाठी कचराकुंडीत शिरले असेल. मात्र काही क्षणात कचराकुंडीतून 6 वर्षाच्या चिमुरड्याने डोके वर काढले आणि सर्वांच्या काळजाचे पाणी झाले.त्याने निष्पाप नजरेने पाहिले. त्याला विचारले काय करतोयस तर तो कचरा धुंडाळत म्हणाला, बाटल्या गोळा करतोय…विकायला मावशीकडं देणारयं. शाळेत जातो का विचारले असता उत्तर दिले.. या वर्षी जाणारयं.पाहिलेले वास्तव अन कानावर पडलेली वाक्‍य ऐकून बघ्यांचे मन्न सुन्न झाले आणि डोक्‍यात असंख्य प्रश्‍नांचे वादळ निर्माण झाले.

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली त्यावर आजही विश्‍वास बसत नाही जेव्हा दोन वेळच्या अन्नासाठी चिमुरड्याला 70 नंबरच्याच कचराकुंडीचा आधार घ्यावा लागतो. जगात मंगळवारी सर्वत्र जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा होत होता मात्र दुसऱ्या बाजूला जगाचा अन भारताचा काही संबध नाही असे ते चित्र राधिका रोडवरचे होते. कारण दोन वेळच्या अन्नाच्या शोधासाठी तो बालक ही नव्हता अन कामगार ही. त्याला फक्त पोटाची भुक माहिती होती. त्याला एवढेच माहिती होते सोबत आणलेले पोते बाटल्यांनी भरून आपल्या मावशीकडे द्यायचयं. त्याला माहित नव्हते की ह्या देशात आपल्यासाठी निर्माण झालेले सरकार, कायदे, अधिकार अशा काही गोष्टी आहेत. त्याला फक्त जगण्यासाठी एखाद्या जनावराप्रमाणे पोट भरायचे एवढेच माहिती होते.

मात्र, त्याला आता यावर्षी शाळेत जायचे होते. शाळेत जावून शिकायचे हे स्वप्न त्याने पाहिले आहे. मात्र, एका बाजूला प्रत्येक दिवस अस्तित्व टिकविण्यासाठी पोटाची भुक भागविण्याचे आव्हान अन दुसऱ्या बाजूला शिक्षणातून भवितव्य घडविण्याचे दुसरे आव्हान. या दोन्हीची सांगड घालून त्याला पुढे जावे लागणार आहे. हे कसे शक्‍य होणार. त्यासाठी सरकार नावाची जी चीज आहे ते कधी तरी प्रयत्न करणार का, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना अशा चिमुरड्यांच्या भवितव्याची काळजी का नाही, देशाच्या व राज्याच्या सरकारमध्ये बालकांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली ही नेमकी कोणासाठी केली आहे. संबधित खात्याचे मंत्री व अधिकारी काय करतात जेव्हा 70 नंबरची कचराकुंडी पाहिल्यानंतर प्रश्‍न निर्माण होतात.

कचराकुंडी अन तो चिमुरडा हे प्रातिनिधीक उदाहरण समोर आले आहे. आज सातारा शहर व परिसरात अनेक ठिकाणी बालके पोट भरण्यासाठी फिरताना दिसून येतात. लग्न समारंभादरम्यान आजही अशा चिमुरड्यांची गर्दी झालेली दिसून येते. खेळण्याचे, बागडण्याचे ते वय मात्र पोटाची भुक अन जगण्याचा संघर्ष आज ही त्यांना करावा लागत आहे. देश एका बाजूला महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतोय. कोठे पोट भरण्यासाठी कचराकुंडीचा आधार तर पुढे शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असताना नगरपालिका अन जिल्हापरिषदेच्या शाळांचा खालवत चाललेला दर्जा हे पाहता गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरटीईची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने भविष्यात गोरगरिबांची मुले शिकणार तरी कोठे व कशी हा प्रश्‍न आहे. ह्या प्रश्‍नासह कचराकुंडी अन लग्न व इतर समारंभाव्दारे पोट भरणाऱ्या मुलांचा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी ज्या सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आहे त्यांनी वेळीच संवेदनशील व सतर्क होणे आवश्‍यक आहे. नाहीतर येणारा काळ कोणालाच माफ करणार नाही हे नक्की.

…तर उद्या देशाचा बिहार होणारच
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचे सर्व्हेक्षण करून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करित आहे. त्यात कितपत यश आले हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, बालकांना दोन वेळचे पोट भरण्यासाठी कोठे कचराकुंडीचा तर कोठे दुकानांमध्ये काम करावे लागत आहे. सरकारने कायदा करून बालकामगार ठेवण्यास प्रतिबंध जरूर केला आहे मात्र त्यांचे प्रथमत: दोन वेळचे पोट कसे भरेल याचा कोठेही विचार केलेला नाही. मुलांना अगोदर दोन वेळचे अन्न सन्मानाने व सुखाने दिले गेले तरच ही मुले भविष्यात शिक्षणाच्या प्रवाहात येवू शकतील अन्यथा येत्या काळात साताराच काय तर देशाचा बिहार करण्याशिवाय त्या उद्याच्या भावी पिढीपुढे पर्याय नसेल.

स्वयंसेवी संस्था करतात काय
बालकांच्या हक्कांचा डांगोरा पिटून आज साताऱ्यात अनेक सामाजिक संघटना काम करित आहेत. त्यांनी आजपर्यंत बालकांसाठी कितपत कार्य केले, समाजातून आणि सरकारकडून निधी मिळवला हे प्रश्‍न निर्माण आता निर्माण झाले आहेत. केवळ बालकांच्या हक्कांवर कामगार आयुक्त यांच्याबरोबर औपचारिक वादविवाद अन बैठका करायच्या. बालहक्क समित्यांचे सदस्य म्हणून मिरवणे हे थांबवून आता खऱ्या अर्थाने संस्थांना काम करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)