सातारा: 46 फ्लॅटधारकांचा आत्मदहनाचा इशारा

सातारा – शिरवळ येथील नियोजित गणेशकुंज सोसायटीच्या विकासकाने 46 फ्लॅटधारकांना वेठीस धरले असून आराखडा बदल करण्यासाठी संमती न घेता टाऊन प्लॅनिंग विभागाकडून मंजुरी घेतली आहे. वास्तविक या बदलास फ्लॅटधारकानी लेखी हरकत दाखल केली होती. बिल्डरच्या या मनमानी एकाधिकार शाहीबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. तसेच न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. मात्र, अद्याप न्याय न मिळाल्याने दि. 22 मे रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गणेशकुंज सोसायटीचे 46 फ्लॅटधारक आत्मदहन करणार आहेत. याबाबतचे लेखी निवेदन नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा येथील गट नं.1319/1 मध्ये 2011 नतर 2012 साली टाऊन प्लॅनिंग विभागाने आराखड्यास मंजुरी दिली. त्याप्रमाणे 46 फ्लॅटधारकांनी स्वत:च्या फ्लॅटवर बॅंकेकडून गृहकर्ज घेतले आहे. मात्र, विकासक गायकवाड : राठी असोशिएटस यांनी 2012 नंतर मंजूर आराखड्या फेरबदल करताना 46 फ्लॅटधारकांना वेठीस धरले आहे. त्यांची कोणतीही संमती न घेता 2016 व 2017 साली टाऊन प्लॅनिंग विभागाकडून मंजुरी घेतली आहे. या बदलास फ्लॅटधारकांनी लेखी हरकत दाखल केली होती. प्रांताधिकारी यांच्याकडे लेखी दादही मागितली होती. परंतु न्याय न मिळाल्याने दि. 29/11/2017 व 11/12/2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. परंतु अद्यापपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. प्रांताधिकारी वाई आणि टाऊन प्लॅनिंग विभागाचे श्रीकांत देशमुख यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. यानंतर 28/2/2017 रोजी विकासकाने आराखडा मंजुरीसाठी खोटे पत्र सादर केले असल्याने गायकवाड : राठी असोशिएटसवर 190, 199, 200 आणि 420 प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त असताना पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत म्हणून आम्ही फ्लॅटधारक आत्मदहन करणार आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.

गणेशकुंज सोसायटीच्या फ्लॅटधारकांनी केलेल्या मागण्यांमध्ये 2012 सालच्या मंजुर आराखडयाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. टाऊन प्लॅनिंगचे श्रीकांत देशमुख यांच्यासह दोषी भ्रष्ट वाई प्रांताधिकारी आणि शिरवळ पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी तसेच 2012 साली फ्लॅटधारकांनी विकासकाने केलेल्या कराराची अंमलबजावणी व्हावी अन्यथा आत्मदहन करण्यासोबत न्यायालयीन लढा देण्याचा इशारा संतोष मोहिते, नंदू सातपुते आणि विलास रणवरे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)