सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

सातारकर धावण्यासाठी झाले सज्ज:देशविदेशातील स्पर्धक दाखल
सातारा – सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही रविवार, दिनांक 2 सप्टेंबर 2018 रोजी संपन्न होत असून, या स्पर्धेचे हे 7 वे वर्ष आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेची उत्कंठा आता शिगेला पोहोचली. या स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेचा शुभारंभ मा.खा.उदयनराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री विजय शिवतारे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनीचे चिफ मार्केटींग अधिकारी निपुण कौशल यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच विविध शासकीय अधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचा शुभारंभ रविवार, 2 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6. 00 वाजता सातारा नगरपरिषदेनजीक असणाऱ्या तालीम संघ मैदान येथून होणार आहे. स्पर्धेमध्ये धावण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांनी पहाटे 5. 00 वाजता तालीम संघ मैदान, दुर्गा पेठ येथे उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. स्पर्धकांनी स्पर्धेसाठी येताना आपली वाहने ही स्पर्धेच्या मार्गावर अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावावीत. यासाठी स्पर्धेच्या मुख्य मार्ग सोडून सर्व सातारकरांनी आपली वाहने पोवई नाक्‍याच्या खालील बाजूस वाहनांसाठी आरक्षित केलेल्या ठिकाणीच व रहदारीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने लावावीत अशी विनंती संयोजकातर्फे करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येताना स्पर्धकाने आपला बीब आणणे आवश्‍यक आहे. ज्या स्पर्धकांनी येताना सोबत आपले काही साहित्य आणले असेल ते ठेवण्यासाठी तालीम संघ मैदानावरच बॅगेज कॉउंटरची व्यवस्था केलेली आहे. तिथे स्पर्धकांनी सोबत आणलेले साहित्य या बॅगेज कॉउंटरवर जमा करून त्याची पावती घ्यावयाची आहे.

या स्पर्धेचा प्रारंभ तालीम संघ मैदान येथून झाल्यानंतर ही स्पर्धा कमानी हौद, देवी चौक मार्गे राजपथ, मोती चौक, राजवाडा व पुढे गोल मारुती मंदिर मार्गे, यादोगोपाळ पेठेतून समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे गणेश खिंडीच्यापुढील पठारापर्यंत जाईल. तिथून ही स्पर्धा पुन्हा त्याच मार्गाने परत प्रकृती हिल रिसॉर्टमार्गे यवतेश्वर घाटातून, बोगदा, समर्थ मंदिर मार्गे अदालत वाडा, केसरकर पेठ, नगरपालिका, दिग्विजय चौक मार्गे येऊन पुन्हा तालीम संघ येथे समाप्त होईल. या अर्धमॅरेथॉन स्पर्धेसाठी देशभरातील विविध शहरातील, तसेच केनिया, फिनलंड, जर्मनी, इथिओपिया, इंग्लंड आदी देशातील स्पर्धक साताऱ्यात दाखल झाले आहेत.

ही स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी,औषधे, बिस्कीटं, वेदनाशामक स्प्रे इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्‌सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला जर काही त्रास झालाच तर त्या स्पर्धकाला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना नुकतेच देण्यात आले आहे. जर त्यातून एखाद्या स्पर्धकाला जास्तच त्रास झालाच तर स्पर्धेच्या मार्गावर सुसज्ज अशा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. जेणे करून अशा स्पर्धकाला त्वरित हॉस्पिटल दाखल करता येईल.

साताऱ्यातील काही हॉस्पिटलमध्ये अशा बेड्‌स राखून ठेवल्या आहेत. प्रतिभा हॉस्पिटल अँड हार्ट केअर सेंटर हे या स्पर्धेचे अधिकृत मेडिकल पार्टनर आहेत अशी माहिती संयोजन समितीचे उपाध्यक्ष व मेडिकल डायरेक्‍टर डॉ.प्रतापराव गोळे यांनी दिली.

या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ हा सकाळी 8.30 वाजता सुरु होईल. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पंकज देशमुख, खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री विजय शिवतारे, आ श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारच्या नगराध्यक्षा सौ माधवी कदम, उपनगराध्यक्ष श्री सुहास राजेशिर्के सर्व नगरसेवक, विविध पक्षांचे जिल्हाध्यक्षदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या वेळी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विजेत्याना बक्षिसे दिली जातील. सातारा जिल्ह्यातील बक्षिसे ही नंतर सातारा येथे आयोजित केलेल्या स्वतंत्र समारंभामध्ये देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची खास बाब म्हणजे सातारकरांचा मिळणार उस्फूर्त प्रतिसाद. सन 2012 साली झालेल्या पहिल्या वर्षी या अर्धमॅरेथॉन स्पर्धेमध्ये केवळ 12 सातारकर सहभागी झाले होते. यावर्षी सातारकरांनी 2000 चा पल्ला पार केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये महिलादेखील उस्फूर्तपणे व तेवढ्याच तयारीने स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून साताऱ्याची नवी ओळख करून देत आहेत.

पी एन बी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य मार्केटींग अधिकारी श्री निपुण कौशल यांनी बोलताना सांगितले की,पी एन बी मेटलाईफ कंपनी हेल्थ ऍनड हॅपीनेस या संकल्पाअंतरगत सातारा हिल हाफ मॅरेथॉनशी गेल्या चार वर्षापासुन संलग्न आहे.व्यक्तीगत आरोगयाचे संवर्धन करण्यासाठी धावण्यासारखा व्यायाम नाही.पी एन बी मेटलाईफ सर्व धावकांचे स्वागत करत असुन जागतीक दर्जावर मान्यता पावलेलया या मॅरॅथॉनसाठी येणारया धावकांमधील बी ए हीरो या यावर्षीच्या संकल्पास आम्ही पाठिंबा देणार आहोत.

सातारा रनर्स फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे,अध्यक्ष सुजित जगधने,उपाध्यक्ष डॉ प्रताप गोळे, सचिव डॉ सुचित्रा काटे तसेच सातारा रनर्स फौंडेशनचे माजी अध्यक्ष अड कमलेश पिसाळ, डॉ चंद्रशेखर घोरपडे, सीए विठ्ठल जाधव व संयोजन समितीमधील सर्व सदस्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी साताऱ्यातील या उपक्रमात आपापल्या परीने सर्वानी सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे

अर्ध मॅरेथॉन या मुख्य स्पर्धेचा प्रारंभ झाल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6.45 वाजता 3. 00 कि मी.च्या हिरोज रन या फन रनला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा प्रारंभ तालीम संघ मैदान येथून होणार आहे.त्यानंतर ही स्पर्धा कमानी हौद, देवी चौक मार्गे राजपथ, मोती चौक, राजवाडा, गोल मारुती मंदिर मार्गे, यादोगोपाळ पेठतील जानकीबाई झंवर शाळा (जुने कला वाणिज्य कॉलेज) येथपर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गाने तालीम संघ मैदान येथे येऊन ही स्पर्धा संपेल अशी माहिती या फन रनचे संयोजक श्री पंकज नागोरी, राहुल घायताडे व अभिषेक भंडारी यांनी दिली. या स्पर्धेमुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय झाले असून स्पर्धेसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे व त्यातून सर्व सातारकर नागरिक एक झाले असून त्यामुळे सातारा शहराचे वैभव वाढून पर्यटनाला चालना मिळेल.

या स्पर्धेदरम्यान राजपथ पहाटे 5.00 वाजल्यापासून सकाळी 9. 00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान सातारकर नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची कल्पना आम्हास असून शक्‍यतो कोणास मोठी अडचण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत असे आश्वासन संयोजकांनी दिले आहे. सातारकर नागरिकांनी स्पर्धेदरम्यान सहकार्य करून ही स्पर्धा व तिचे वैभव खऱ्या अर्थाने सातारकारांचे आहे या भावनेने आम्हास सहकार्य करावे अशी विनंती संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)