सातारा: सत्ताधारी मैदानात, विरोधक मात्र घरात

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला हवी कार्यशाळा
जनतेशी निगडीत प्रश्‍नांसाठी विरोधक असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून आंदोलने होणे अपेक्षित होते. मात्र, मागील चार वर्षात अल्प प्रमाणात आंदोलने झाली. सतत सत्तेत राहिल्याचा परिणाम अद्याप दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अद्याप दिसून येत आहे. परंतु आता जिल्ह्यात भाजपचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा स्थितीत अन वाढती महागाई व प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आंदोलनासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्याची मागणी युवा कार्यकर्ते करू लागले आहेत.

सम्राट गायकवाड

जनतेच्या प्रश्‍नावर विसंगत भूमिका : जिल्ह्यात चर्चांना उधाण

सातारा – देशात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने जिहे-कठापुर उपसा सिंचन योजना पुर्ण करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढून आंदोलनाचे हत्यार उपसले तर दुसऱ्या बाजूला इंधन दरवाढीच्य विरोधात रिपाइंने साताऱ्यात चक्क दुचाकीची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. इंधन आणि पाणी नागरिकांच्या जीवनाशी निगडीत दोन्ही प्रश्‍नांवर संवेदनशीलता दाखवून सेना व रिपाइंने आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. तर दुसऱ्या बाजूला प्रमुख विरोधक असलेली कॉंग्रेस आंदोलनात कुठेच सहभागी होताना दिसून आली नाही. तर सेनेने आंदोलन पुकारल्यानंतर ते हायजॅक करण्यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आंदोलनात सहभागी झाले. एकूणच सत्ताधारी अन विरोधकांच्या विसंगत भूमिकेमुळे मात्र जिल्ह्यातील जनतेची अवस्था वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे झाली आहे.

समाजातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबधित खात्याचे मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून प्रश्‍न सोडवणे तर विरोधकांनी त्या प्रश्‍नावर लोकशाही मार्गाने आंदोलने करून सरकारला जागे करण्याचे काम केले पाहिजे असा प्रघात आहे. मात्र, सध्या राज्यात व प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात सत्ताधारी व विरोधकांकडून विसंगत भूमिका घेतली जात आहे. दुष्काळी माण व खटावला पाणी मिळावे यासाठी 1995 मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारने जिहे-कठापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली होती. तदनंतर 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला योजना पुर्ण करता आली नाही. त्यांच्या निष्क्रीय कृतीबद्दल विरोधक त्यांच्यावर सातत्याने टिका करित होते. मात्र, 2014 साली देशात व राज्यात सत्तांतर झाले अन युती सरकारची सत्ता आली. सत्तेत आल्यानंतर विद्यमान पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी एका वर्षात जिहे-कठापुर योजना पुर्ण करण्याची डरकाळी फोडली. मात्र, त्यानंतर तारीख पे तारीख सांगत आता डिसेंबर 2018 पर्यंत योजना पुर्ण करण्याची नव्याने आश्‍वासन दिले आहे. असे असताना खटाव तालुका शिवसैनिकांनी जिहे-कठापुर योजना पुर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे.

वास्तविक जिहे-कठापुर योजनेवरून प्रमुख विरोधक व स्थानिक आमदार या नात्याने आ.शशिकांत शिंदे व आ.जयकुमार गोरे यांनी संयुक्तरित्या आंदोलन पुकारणे गरजेचे होते. मात्र, कॉंग्रेस आंदोलनात कोठेही सहभागी झाली नाही तर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते आंदोलनात घुसवून हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. एकूणच शिवसैनिकांची दुष्काळी जनतेप्रती असलेली भावना रास्त आहे परंतु त्यांनी निवडलेला मार्ग जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे असे म्हणता येणार नाही. आपण सत्तेत आहोत याचे भान ठेवून त्यांनी पालकमंत्र्यांना घेरून योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यातून ही मार्ग नाही निघाला तर मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दुष्काळी जनतेची भावना अन पालकमंत्र्यांविषयी असलेले त्यांचे मत स्पष्ट पणे सांगितले तर काही मिनिटांमध्ये प्रश्‍न सोडविता येवू शकतो. मात्र, तरी ही शिवसैनिकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यावरून जिल्ह्यात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे. तर दुसऱ्या बाजूला मागील 15 वर्ष सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे आ.गोरे व आ.शिंदे यांची आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नेमकी काय भूमिका आहे, ती जनतेपुढे स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. अन्यथा निवडणूका 10 महिन्यांवर येवून ठेपलेल्या आहेत वेळीच भूमिका जाहीर न केल्यास त्याचा मोठा फटका निवडणूकीत निश्‍चितपणे बसू शकतो.

तसेच दोन दिवसांपुर्वीच सातारा दौऱ्यावर आलेले केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याची घोषणा करून गेले. मात्र, त्यांची पाठ फिरताच स्थानिक रिपाइं कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीवर दुचाकीची प्रेतयात्रा काढून सरकार विरोधी घोषणा तर दिल्याच त्याचबरोबर अच्छे दिनाबद्दल प्रश्‍न ही उपस्थित केले. मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्यापैकी काही कार्यकर्ते आठवलेंच्या दौऱ्यात सहभागी होते. त्यावेळीच त्यांनी इंधन दरवाढीबाबत जनतेच्या भावना आठवलेंच्या कानावर घालायला हव्या होत्या. मात्र, त्यांनी तसे न करता आंदोलन केले. परिणामी सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाकडून आंदोलन व विरोधात असूनही आंदोलने न करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विसंगत भूमिकेबद्दल जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

असे पालकमंत्री होणे नाही
पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. पालकमंत्री व संबधित खात्याचे असून चार वर्षात त्यांनीच घोषणा केलेली अद्याप जिहे-कठापुर योजना पुर्ण होत नाही हे र्दुदैव आहे. त्याच बरोबर विरोधक दोन्ही आमदार ही शांततेच्या भूमिकेत आहेत ही अधिक दुदैवाची बाब आहे. मात्र, अशातच आता शिवसैनिक आंदोलनाच्या माध्यमातून जरी भाजप सरकारवर टिका करत असले तरी त्यांचा निशाना पालकमंत्र्यावर असण्याची शक्‍यता आहे. त्यातच पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील एका ही मोठ्या प्रलंबित प्रश्‍नाची सोडवणूक झालेली नाही. तसेच आजपर्यंत सातारा जिल्ह्याला परजिल्ह्यातील अनेक पालकमंत्री लाभले परंतु त्यांच्याकडून साताऱ्याकडे कधीच दुर्लक्ष झाले नाही तेवढे शिवतारे यांच्याकडून झाले आहे. केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, नियोजन समिती सभेसाठी त्यांची जिल्ह्यात औपचारिक हजेरी असते. तसेच शिवसैनिकांना ही म्हणावे असे बळ त्यांनी चार वर्षात दिले नाही अशी ओरड सातत्याने होत असूत आता मात्र त्यांच्याबद्दल नाराजीचे प्रमाण वाढत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)