सातारा : शतकवीर आजोबांच्या हाती टिकाव

पळशी- माण तालुक्‍यात सर्वच पाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभागी गावात धुमशान सुरू आहे. यावर्षी पळशी गावाने सहभाग नोंदवला असून गावामध्ये पाणी फाऊंडेशनचे काम धडाक्‍यात सुरू आहे. यामध्ये अनेक महाकाय दुष्काळाचे साक्षीदार असलेले व वयाची शंभरी पार केलेल्या तात्याबा हरिबा खाडे यांनी ही दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी हाती टिकाव घेतला आहे.

पळशी गावाने नेहमीच दुष्काळाशी सामना केला असून 1972 सारखा भयानक दुष्काळ मी पाहिला आहे. सध्या पावसाचे पाणी अडवणे गरजेच असून सर्वांनी त्यासाठी हाती टिकाव घेतला पाहिजे तर दुष्काळ नाहीसा होईल.
– तात्याबा खाडे, पळशी.

पश्‍चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व माण तालुक्‍यात सर्वात मोठे गाव असलेल्या पळशी गावाने या वर्षी सहभाग नोंदवला असून गावाने वॉटर कप जिंकण्याच्या विडा उचलला आहे. त्यासाठी लहानांपार्सन थोरांपर्यंत सर्वजण श्रमदान करून दुष्काळावर मात करण्यासाठी हेवेदावे विसरून एकत्र आले आहेत. श्रमदानासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असतात. सध्या गावात अनेक ठिकाणी श्रमदानातून कामे सुरू आहेत.

-Ads-

यामध्ये अनेक भयानक दुष्काळाचे साक्षीदार असलेले व या दुष्काळाचे चटके सोसलेले वयाची शंभरी नुकतीच पार केलेले तात्याबा हरिबा खाडे यांनी दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी हाती टिकाव व खोरे घेतले असून ते पळशी गावात गणुची वस्तीनजीक सुरू असलेल्या कामावर सर्वांसोबत काम करत असतात. त्यांनी शंभरी पार केली असली तरी शरीरयष्टी अजुनही मजबूत आहे. त्यामुळे ते सर्वांसोबत श्रमदान करत असतात. त्यांनी अनेक वेळा दुष्काळाशी सामना केला आहे.

ते दररोज अवतीभवतीच्या लोकांना सोबत घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांच्याकडुन श्रमदान करण्याची एक प्रकारे प्रेरणा मिळत असून पुढच्या पिढीला दुष्काळाचे चटके बसणार नाहीत. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

अधिकारी व डॉक्‍टरांचे कुटूंब!
पळशी हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे तात्याबा खाडे यांच्या घरात सून डॉ. वर्षा खाडे (सिव्हिल सर्जन), नातवंडांमध्ये डॉ. राजेंद्र खाडे (प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ), डॉ. प्रेमकुमार खाडे, अमोल खाडे (पोलीस उपनिरीक्षक), डॉ. ऐश्वर्या खाडे तर नातसुनांमध्ये डॉ. अश्विनी खाडे (वैद्यकीय अधिकारी), पुनम खाडे (आयकर उपायुक्त) असे त्यांचे उच्चशिक्षित कुटुंब आहे तर काही जण शेती करत आहेत.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)