सातारा: वसुलीचा घोळ, घरपट्टीचा बट्ट्या बोळ

227 मिळकतधारकांची वसुली गुंडाळली
केवळ अनास्थेमुळे यावेळी वसुली विभागाकडून पावणेआठ कोटीची वसुली झाली आहे. म्हणजे चालू वर्षी मूळ उद्दिष्टाच्या तब्बल 43 टक्के वसुली कमी झाली. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार 227 मिळकत धारकांची वसुली पन्नास हजारापेक्षा अधिक आहे. त्या विषयी मात्र कोणी चकार शब्द काढायला तयार नाही. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी याबाबत अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. वसुली विभागाला सक्षम म्होरक्‍या नसल्यानेच अचूक वसुलीचा घोटाळा झाला आहे. मोहन प्रभुणे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची येथे गरज आहे. मात्र, त्यांचा सक्षमतेचा उपयोग पालिका प्रशासनाकडून होत नाही हेच दुर्दैव आहे.

महिनाभरात त्रिशंकू आणि हद्दीवरच्या नागरिकांना अवास्तव घरपट्टीची बिले

संदीप राक्षे

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांचा राजकीय कस बघणारी लोकसभा निवडणूक अवघ्या अकरा महिन्यावर येऊन ठेपली आहे. सातारा पालिकेत होमग्राऊंडवर उदयनराजेंच्या अडचणी वाढतील अशा घटना घडू लागल्या आहेत. सातारा पालिकेचा आत्मा असणाऱ्या वसुली विभागाला खमक्‍या कारभाराच्या अभावामुळे कोणी वालीच उरला नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात त्रिशंकू आणि हद्दीवरच्या नागरिकांना हजारो रूपयांच्या घरपट्टीची बिले गेल्याने संतापाचे वातावरण आहे. त्यात घरपट्टी भरण्यासाठी पालिकेत येणाऱ्या नागरिकांना घरपट्टी भरा नाही तर कोर्टात जा असे उपटसुंभ सल्ले दिले जात असल्याने मिळकतधारकांना कपाळावर हात मारायची वेळ आली आहे. सातारा पालिकेच्या कारभारात सत्ताधारी सातारा विकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या नादात सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. वसुली विभागावर मुख्याधिकाऱ्यांनी तीन अधिकाऱ्यांच्या ऑर्डर काढूनही प्रत्यक्ष कोणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी. वसुली विभाग बघणाऱ्या सुहास पवार यांची वृक्ष विभागात बदली करण्यात आली.

अरविंद दामले व राजेश काळे या दोघांची ऑर्डर सहाय्यक करप्रमुख म्हणून काढण्यात आली. मात्र, काळे यांच्याकडे सभासचिव पदाची जवाबदारी असल्याने त्यांनी वसुलीत स्वारस्य दाखवले नाही. आस्थापना विभाग सांभाळणाऱ्या अरविंद दामले यांच्या चिपळूण बदलीनंतर आधी आस्थापना नंतर वसुली अधीक्षक ही जादा जबाबदारी देण्यात आली. मात्र, घरपट्टीची बिले इतर महत्वाच्या फायली दामलेंना वगळून थेट मुख्याधिकाऱ्यांकडे जात असल्याचे लक्षात आल्यावर दामले यांनी आस्थापना व वसुली विभाग सोडून नगराध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांची खुर्ची पकडली. अंजली कॉलनी, अर्क शाळा नगर तसेच केसरकर पेठेतील नागरिकांना चुकीच्या पध्दतीने चक्रवाढ व्याज आकारून हजारो रुपयांची घरपट्टीची बिले देण्यात आल्याने संतापाचे वातावरण आहे. स्कवेअर फूट गुणिले घरगुती आणि वाणिज्य असे गुणांकन म्हणजे चालू घरपट्टी आणि विहित मुदतीत ती भरली न गेल्यास त्यावर दोन टक्के दंड आकारण्याची पद्धत आहे. थकबाकी भरून व्याज आकारणी अपिलाद्वारे माफ करून घेण्याची सोय सुध्दा उपलब्ध आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने व्याज आकारून सामान्यांच्या आवाक्‍याबाहेरची बिले काढण्यात आल्याचा नागरिकाचा आरोप आहे. केसरकर पेठेतील माजी उपनगराध्यक्षाच्या नातेवाईकाला तब्बल 48 हजार रुपये घरपट्टी आकारण्यात आली. ज्या गाळ्याला घरपट्टी आकारली गेली त्याच आकाराच्या दुसऱ्या व्यापाऱ्याच्या गाळ्याला केवळ सात हजार रुपये आकारणी झाली. या अजब आकारणीमुळे मिळकतधारकांचे सुध्दा डोके चक्रावले आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी वसुली लिपिकाला या प्रकरणाची टिप्पणी ठेवण्याचे आदेश देऊनही लिपिक कामात टाळाटाळ करत आहेत. सदर मिळकतधारक महिलेने स्वतःच्या मुलीचा प्रवेश रद्द करून त्याचे पैसे भरायची तयारी दाखवली. मात्र कागदपत्रे मिळवण्यासाठी तिला टाचा घासण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)