सातारा : ‘वजराई’च्या विकासाचा नारळ फुटणार

भांबवलीकरांचे उजळणार भाग्य


पर्यटनवाढीस चालना

परळी- देशातील सर्वात उंच असण्याची ख्याती प्राप्त झालेल्या सातारा तालुक्‍यातील भांबवली येथील वजराई धबधब्याच्या विकासकामांचा नारळ शुक्रवार दि.27 रोजी फुटणार असल्याने भांबवलीकरांचे भाग्य उजळणार आहे. त्यामुळे पर्यटकांना ठोसेघर धबधब्याप्रमाणे पुढील वर्षी या धबधब्याचा मनमोकळेपणाने आनंद लुटता येणार आहे.साहजिकच पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे.

भांबवलीचा धबधबा सुमारे 1840 फुटांवरून तीन टप्प्यात कोसळत आहे. देशातील सर्वात उंच धबधबा असण्याचा मान व्हिकीपीडिया या संस्थेने सर्व्हे केल्यानंतर मिळाला. त्यानंतर भांबवली ग्रामस्थ आणि वनविभागाच्या मदतीने परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला 2 जानेवारी 2017 च्या बैठकीत “क’ वर्ग दर्जा देण्यात आला.

-Ads-

याच बैठकीत वनपर्यटनाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून यावर्षीच्या पहिल्या टप्प्यात पायरी मार्ग, रेलिंग, पायवाट दुरुस्ती यासह इतर कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्त वन कमिटी भांबवली यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

याच माध्यमातून धबधबा परिसराचा विकास होणार असून या विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार, दि.27 रोजी दुपारी 3 वाजता कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिवसह्याद्री परिवाराचे प्रमुख ज्ञानेश्वर (भाई) वांगडे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, माजी जि. प. सदस्य राजू भोसले, जि. प. सदस्या कमल जाधव, पं. स. सदस्या विद्या देवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यासह गुरुवार, दि. 26 रोजी सायंकाळी 4 वाजता गावातून जानाईदेवी मूर्तीची भव्य मिरवणूक, रात्री वाजता कुरून येथील पद्मावती भजन मंडळाचा कार्यक्रम होणार असून शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता जानाईदेवीच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा वेदमूर्ती बोरीकर गुरुजी व विद्वत ब्रह्मवृद्ध यांच्या वेदघोषात होणार आहे. तर रात्री मुंबईस्थित प्रसिद्ध तरुण कीर्तनकार हेमंत महाराज मोरे यांचे कीर्तन होणार आहे.

आता प्रतिक्षा संपणार
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारासह देशातला एक नंबर म्हणून भांबवली वजराई धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पर्यटनाचा “क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे विकासकामे होऊन ठोसेघर धबधब्याप्रमाणे पर्यटकांना सर्व सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे पर्यटन वाढीस भर मिळणार असून स्थानिकांना व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
– रवींद्र मोरे,
भांबवली ग्रामस्थ.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)