सातारा: मोरणा नदीला कचऱ्याचा विळखा

कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची ग्रामस्थांची मागणी

मोरगिरी – पेठशिवापूर-मोरगिरी येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या चिकन व मटण व्यावसायिकांकडून बोकड, कोंबड्या कापल्यानंतर निघणारा टाकावू मांस कचरा हा मोरणा नदीत व ओढ्यात टाकला जात आहे. त्यामुळे मोरणा नदीचे पाणी दुषित होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करुन कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

या प्रकारामुळे मोरणा नदीवरून पिण्याच्या पाण्याच्या योजना असलेल्या गावांमधील लोकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांनी याबाबत संबंधित दुकानदारांना अनेक वेळा तोंडी सूचना दिल्या आहेत. मात्र, हे मटण व्यवसायिक तात्पुरती कचऱ्याची विल्हेवाट लावतात. व पुन्हा “ये रे माझ्या मागल्या’ अशीच अवस्था निर्माण होते. पेठशिवापूर येथे बाजार भरत असल्याने या ठिकाणी सगळ्यात जास्त कचरा होत असतो. यामध्ये मांसाच्या कचऱ्याची आणखीन भर पडली आहे. गेल्याच वर्षी पेठशिवापूर येथे चिकुनगुणिया या आजाराने थैमान घातले होते. तर दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सारख्या साथीच्या रोगाने ग्रामस्थ हैराण झाले होते. यासाठी पेठशिवापूर व मोरगिरी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी यावर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)