सातारा महामार्गाचे काम ‘सुसाट’

रखडलेल्या ठिकाणचे भूसंपादन सुरू : लवकरच होणार काम

पुणे – भूसंपादन आणि अन्य तांत्रिक अडथळ्यांमुळे मागील काही महिन्यांपासून पुणे-सातारा महामार्गाच्या सहा पदरी रूंदीकरणाच्या कामाला “ब्रेक’ लागला होता. मात्र, हा अडथळा दूर करत “एनएचएआय’कडून पुणे-सातारा महामार्गाच्या कामाला सुरवात केली आहे. रूंदीकरणासाठी रखडलेल्या ठिकाणचे भूसंपादनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. संबधित जागा मालकांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे कामाला गती मिळाली असून, येत्या काही महिन्यातच वाहनचालकांसाठी हा मार्ग विनाअडथळ्याचा खुला होणार आहे. दरम्यान, या मार्गावरील खंबाटकी घाटात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या बोगद्याच्या कामाची निविदा मार्च अखेर काढण्यात येणार असल्याचे एनएचएआयने सांगितले.

खंबाटकी घाटात आणखीन एक ‘बोगदा’
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने दुसऱ्या बाजूला नवीन घाटरस्ता तयार केला. त्यासाठी साधारण एक किलोमीटरचा बोगदा काढून हा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, हा बोगदा वाहतुकीसाठी कमी पडत आहे. बोगद्यात वारंवार वाहतुक कोंडी होते. त्यामुळे या बोगद्याच्या बाजूलाच दुसरा बोगदा तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यात या कामाची निविदा काढण्यात येणार असून, त्यानंतर भूसंपादन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असे एनएचएआयकडून सांगण्यात आले.

पुणे-सातारा महामार्ग सहा पदरी होत आहे. त्यातील निम्मा मार्ग तयार झाला असून, भूसंपादन आणि काही तांत्रिक अडचणींमुळे 59 किलोमिटरच्या रूंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान या मार्गाच्या कामात थोडा “काळा डाग’ आहे. तो लवकरच पुसून महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे अश्‍वासन दिले होते. त्यानंतर संबधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुणे-सातारा मार्गाचे काम प्रगतीपथावर करून घ्यावे, असा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ते तीन ठिकाणी असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरवात केली असून, त्याला गती मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या महामार्गावरील वेळू गाव आणि सुतारवाडी येथील भूसंपादनाच्या अडचणी आहेत. त्यामुळे काम रखडले आहे. परंतू, लवकरच या भुसंपादनाचे काम पूर्ण होईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच काही दिवसांपासून बंद असलेल्या नसरापूर येथील उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात झाली आहे. लवकरच हा उड्डाणपुल पूर्ण होईल. खेडशिवापूर टोलनाका येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कापूरहोळ येथील कामही प्रगतीपथावर सुरू होईल. तर वारजे येथे आणखीन एक उड्डाणपुल उभारण्याचे नियोजन डीपीआरमध्ये आहे. त्यामुळे वारजे आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना तीन सब-वे वापरासाठी मिळणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात पुणे-सातारा या सहा पदरी महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे महामार्ग विभागाकाडून सांगण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)