सातारा : बीव्हीजीच्या घरकुल योजनेला असुविधांचे ग्रहण

File photo...

संदीप राक्षे

सातारा- सदर बझार येथील बीव्हीजीने उभारलेल्या घरकुलांमध्ये पाण्याचे व्हॉल्व अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याने पाण्याची प्रचंड अडचण झाली आहे. यु पद्धतीची पाणी वितरण व्यवस्था घरकुल धारकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. एका इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या सदनिकेला पाणी पोहचत नाही ही तांत्रिक प्रणाली अडचणीची असून पालिकेने या पध्दतीला मान्यता कशी दिली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

-Ads-

एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानाअंर्तगत भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत सुमारे एकशे दहा घरकुलांचे पाच इमारतीत विभाजन करण्यात आले. सव्वा वर्षापूर्वी चिठ्ठ्या टाकून सदनिकांचा ताबा येथील लाभार्थ्यांना देण्यात आला. मात्र येथील नागरिकांचा संघर्ष संपलेला नाही. घराच्या स्लॅबला तडे, खिडक्‍यांची फुटलेली तावदाने, उखडलेल्या फरशा, पाण्याच्या टाकीत टाकण्यात आलेले दगडधोंडे अशा अनेक अडचणींमुळे येथील नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.

पणं लक्षात कोण घेतो?
बीव्हीजी या ठेकेदार कंपनीने प्रत्येक सदनिकेला जे नळ कनेक्‍शन दिले त्याचे वॉल्व्ह अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वॉल्व्ह ऑपरेट करायला गेल्यास त्याचे तुकडे पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल नऊ वॉल्व्ह तुटल्याने पाण्याची प्रचंड टंचाई आहे. मुख्य टाकीत पाणी असताना वितरण नलिकांना मोठी गळती आहे.

हे लिकेजेस काढली न गेल्याने उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रताप सिंह महाराज सोसायटीमध्ये पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. यु पध्दतीची पाण्याची वितरण व्यवस्था देण्यात आल्याने एकाचे पाणी भरल्याशिवाय दुसऱ्या घराला पाणी पोहोचत नाही. ही प्रणाली प्रत्यक्ष अंमलबजावणीत सदोष असल्याने पाणी वितरणाचा गुंता सुटेनासा झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या भागाला पाणीपुरवठा करते मात्र तांत्रिक दुरुस्तीच्या बाबतीत त्यांनी हात वर केले आहेत.

बीव्हीजी या ठेकेदार कंपनीने वॉल्व्ह वितरण नलिका टाक्‍यांची स्वच्छता ही कामे अनेक वेळा केली आहेत. मात्र वापरणाऱ्यांकडून सुविधा नीट वापरल्या जात नाहीत. तसेच एकाच सदनिकेत पाण्याची पाच कनेक्‍शन असल्याने पाण्याचा घोटाळा होणारच असा दावा पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी केला. त्यामुळे ना प्राधिकरण ना नगरपालिका कोणीच या नागरिकांच्या असुविधांची हमी घेईनासे झाले आहे. त्यामुळे अडचण लक्षात येतेय पण लक्षात कोण घेत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.

लाभार्थ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
लाभार्थी नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी आपली तक्रार घेऊन थेट पालिकेवर धडक दिली होती. यावेळी शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर उपस्थित होते. भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांच्या कानावर नागरिकांची अडचण सांगत सामाजिक लेखा परीक्षणाची मागणी केली. सिध्दी पवार यांनी ताबडतोब मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकारऱ्यांना घेऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नगराध्यक्षांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांनी पालिकेला आठवडाभराची मुदत दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)