सातारा : प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त

मायणी : कोणतेही साहित्य खरेदी केल्यानंतर संबंधित व्यापारी, दुकानदाराने दिलेल्या प्लास्किट पिशवीतच ते घेऊन जाण्याची सवय ग्राहकांना लागली आहे. मात्र, आता प्लास्टिक बंदीमुळे खरेदी केलेले साहित्य पिशवीत न दिल्यास ग्राहक ते साहित्य पुन्हा माघारी करत असल्याने व्यापारी वर्गाला प्लास्टिक बंदीचा चांगलाचा फटका बसला आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवीला पर्याय शोधण्यासाठी किरकोळ व्यापारी प्रयत्न करत आहेत. परंतु, पर्याय स्वस्त नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.

किरकोळ व्यापाऱ्यांकडे खरेदीला येणारा ग्राहक दहा-वीस रुपयांचा माल खरेदी करतो. या दहा वीस रुपयांच्या मालापाठीमागे दुकानदाराला एक किंवा दोन रुपये निव्वळ नफा मिळत असतो. या नफ्यामध्ये त्यांचे दुकान भाडे, गाळाभाडे, बॅंकेचे व्याज व इतर खर्चाचा ताळेबंद त्या दुकानदाराला बसवावा लागतो. प्लास्टिक पिशवीचा पंन्नास ते शंभर नगाचा पुडा साईजनुसार आठ ते पंधरा रुपयांपर्यंत मिळत असे त्यामुळे एक प्लास्टिक पिशवी पंधरा ते पंचवीस पैसापर्यंत दुकानदाराला मिळत होती. त्यामुळे दहा-वीस रुपयांचा खरेदी केलेला मालास पिशवी देताना दुकानदाराला काही वाटत नव्हते.

मात्र, प्लॅस्टिक पिशवी बंदीमुळे व्यापाऱ्यांकडून येणारा माल चढ्या भावाने मिळत आहे. त्यामुळे किरकोळ दहा वीस रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कॅरिबॅग देणे परवडत नाही. तसेच पूर्वीसारखी प्लास्टिक पिशवी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दहा-वीस रुपयांचा बिस्किट पुडा किंव्हा इतर माल घेणाऱ्या ग्राहकाला पिशवी नाही म्हणण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. मात्र, ग्राहक अजूनही प्लॅस्टिक पिशवी बंदीच्या मानसिक स्थितीत नसल्याने तो पिशवी मिळविण्यासाठी अहो पाहुण्यांकडे जायचं आहे, दवाखान्यात पेशंट आहे, बिस्किट पुडा हातात घेऊन जाऊ का? अशी अनेक कारणे पुढे घेऊन खरेदी केलेला माल तेथेच ठेवून निघून जात आहेत.

प्लॅस्टिक पिशवीवर पर्यायी कापडी पिशवी व इतर विघटन होणाऱ्या कागदापासून बनवलेले पिशवी असे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे दर किरकोळ दुकानदारांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. त्यामुळे या पिशव्या दहा वीस रुपयांच्या मालासाठी देणे दुकानदारांना परवडत नाही. त्यामुळे सहाजिकच दुकानदारांचा नाईलाज होत आहे. ग्राहकाला प्लॅस्टिक पिशवी देण्यावाचून दुसरा पर्यायही दुकानदारांसमोर राहत नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदीचे सध्यातरी तीनतेरा वाजलेले दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)