सातारा : पुनर्वसित गावांच्या दप्तराचे ‘भिजत घोंगडे’ कायम 

विशाल गुजर

जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी नाहीच : शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित 

परळी- गावाचे कागदोपत्री पुनवर्सन झाले असले तरी बहुतांशी गावांचे दप्तर मात्र भरले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. दप्तर नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मृत्यू झाल्यानंतरही कित्येकजणांची आजअखेर नोंद झालेली नाही. तीच अवस्था जन्म आणि विवाह नोंदणीबाबत आहे. दप्तर नसल्याने अनेक शासकीय योजनांपासूनही धरणग्रस्त वंचित आहेत. गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर गावस्तरावर सर्व नोंदी ठेवण्यासाठी ग्रामसेवकाकडे जे दप्तर असते त्यामध्ये गावाची इत्यंभूत माहिती संकलित केलेली असते. दरम्यान, उरमोडी धरणग्रस्तांपैकी दहिवड, पुनवडी, लुमणेखोल, कातवडी, कासारथळ, नित्रळ, बनघर, रोहोट, वेणेखोल या गावातील काही कुटुंबे आहे त्याच ठिकाणी डोंगराच्या वरच्या बाजूला सरकून राहत आहेत. याठिकाणी अनेक गैरसोयींचा सामना करत जगणाऱ्या धरणग्रस्तांच्या व्यथांचा पाढाही मोठा आहे. वरील गावांपैकी काही गावांचे दप्तर हे पुनर्वसन झालेल्या नवीन गावात गेले आहे. यामुळे त्याचठिकाणी राहिलेल्या गावकऱ्यांना मात्र तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत आहे.

दप्तर नसल्याने महसूल आणि नागरी सुविधा यांचा बोजवारा उडाला आहे. महसूल मिळत नसल्याने गावात कोणतीही नवी योजना राबवता येत नाही. कोणत्याही नव्या योजनेला उपलब्ध होणारा आर्थिक पुरवठाच नसल्याने अनेक शासकीय योजना राबवता आलेल्या नाहीत. दरम्यान, सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जात आहेत. मात्र, या गावांमध्ये कागदपत्रांअभावी कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना घेत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने धरणग्रस्तांची कोंडी करण्याचे ठरवूनच आजही धरणक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मुलूभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. दप्तर नसल्याने जुन्या ठिकाणी कोणतीही सुविधा पाहिजे असल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, हे अधिकारी तुमचे पुनर्वसन झालेले आहे, तुम्ही पुनर्वसित ठिकाणी स्थलांतरीत व्हा अशा उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम करताना दिसत आहेत. (क्रमश:) 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)