सातारा- पुणे-सातारा ….!

-सम्राट गायकवाड

देशामधील महत्वपुर्ण शहरांपैकी मुंबई व पुणे ही शहरे महाराष्ट्रातील. त्यापैकी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे प्रत्येक भारतीयाला मुंबईबद्दल कायम आकर्षण राहिले आहे. मुंबई पाठोपाठ पुणे शहराचा ही झपाट्याने विकास झाला आणि मागील काही वर्षांपासून पुण्याशेजारील जिल्ह्यांचे महत्व देखील वाढले. त्यापैकीच सातारा जिल्हा. अनेक कारणांनी सातारा जिल्हा सर्वच क्षेत्रातील विकासाच्या तुलनेत पुण्याशी बरोबरी करू शकला नाही. परिणामी जिल्ह्यातील उत्तर भागातील फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्‍वर व सातारा इ. तालुक्‍यातील नागरिकांचा दिवसेंदिवस पुण्याशी संपर्क वाढताना दिसून येत आहे. त्यामागे आरोग्य उपचार, शिक्षण, व्यवसाय, रोजगार, कृषी, खरेदी आदी कारणे आहेत.

आज पुण्यात नामांकित महाविद्यालये असल्यामुळे व त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा पुण्याकडे वाढत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात खंडाळा वगळता इतरत्र नव्याने उद्योग न आल्यामुळे व पुरेसा पगार मिळत नसल्यामुळे येथील युवक रोजगारासाठी पुण्याची वाट धरताना दिसून येत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यात कृषी तंत्रज्ञान पाहण्यासाठी येथील युवा शेतकरी जात आहे तर खरेदीसाठी देखील पुण्याकडे जाणाऱ्या तरूणाईची संख्या वाढत आहे.

एकूणच आता सातारा आणि उत्तरेकडील तालुके आता पुण्याचा एक अविभाज्य भाग होत आहे. पुणे शहराचा विस्तार आता शिरवळपर्यंत वाढला असून कालांतराने तो साताऱ्यापर्यंत येणार ही सातारकरांच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणावी लागेल. कारण, पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके त्या जिल्ह्यात असली तरी अधिक अंतरामुळे त्यांचा पुण्याशी फारसा संपर्क होत नाही. तर आज सातारा ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी केवळ दिड ते पाऊणे दोन तास इतका वेळ लागत आहे. तर खंडाळा व वाई येथून एक ते दिड तास, महाबळेश्‍वर, कोरेगाव व फलटणहून दोन तास इतक्‍या कमी वेळात पुण्याला जाता येत आहे.

भविष्यात वाहतूक कोंडी दूर झाल्यास आणखी वेळ वाचणार आहे व जिल्ह्यातील ही सर्व तालुके जणू पुणे जिल्ह्याच्या कवेत सामावून जाणार आहेत ही देखील महत्वपुर्ण बाब म्हणावी लागेल. भविष्यात सातारा जिल्हा आणि पुण्याचे नाते आणखी घट्ट झाल्यास ज्या प्रमाणे पुण्याहून फलटण येथे कमिन्स व खंडाळ्यात अनेक कंपन्या उभारल्या गेल्या तर येथील बरोजगारीचा प्रश्‍न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर भविष्यात पुण्यात येणाऱ्या आयटी कंपन्यांचा विस्तार सातारा जिल्ह्यात होवू शकणार आहे.

परिणामी येथील रिअल इस्टेटसह इतर छोटे मोठ्या व्यवसायिकांच्या आर्थिक उलाढालीमध्ये होवून सातारकरांचे जीवनमान उंचावणार आहे. त्याचबरोबर पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असल्यामुळे देश विदेशातून पुण्यात येणारे नागरिक सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येवू शकतील त्यामुळे आपसुकच महाबळेश्‍वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर आदी पर्यटन स्थळ परिसरातील व्यवसायामध्ये देखील वाढ होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
5 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)