सातारा: पीक कर्ज न वाटणाऱ्या बॅंकावर कडक कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा: 10 दिवसांची दिली मुदत
सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने यावर्षी त्यांना दिलेले 810 कोटी रुपयाचे पीक कर्जाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे.मात्र राष्ट्रीयकृत आणि इतर बॅंकांनी त्यांना दिलेले उदिष्ट पूर्ण केलेले नाही, त्यांना 10 दिवसांची मुदत दिली आहे. या दहा दिवसात ज्या बॅंका पीक कर्ज वाटपात शुन्यावर असतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.

जिल्हा बॅंकर्सच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक मोझरे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे.जगदाळे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख नितीन थाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर, सहकारचे जिल्हा उप निबंधक प्रकाश अष्टेकर, नाबार्डचे सुबोध अभ्यंकर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक सचिन जाधव, रिझर्व्ह बॅंकेचे जिल्हा प्रतिनिधी, त्याच बरोबर जिल्हातील सर्व बॅंकांचे जिल्हा समन्वयक यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी बॅंकानी पुढाकार घ्यावा. अशा शेतकऱ्यांना फोन करुन पीक कर्ज मेळाव्याला बोलवावे, तिथेच बोलवून त्यांना कर्ज वाटप करावे. मेळावे घेतल्याचे फोटो , मेळाव्याला आलेल्या शेतकऱ्यांची स्वाक्षरीसह नावे घ्यावीत. या बाबतीत मी अतिशय बारकाईने लक्ष घालणार असून यात ज्या बॅंक कुचराई करतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व बॅंकांना उद्देशून सांगितले.
तापोळा येथे नाबार्डने कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटनासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी तापोळा येथे रोल मॉडेल उभारले आहे. या मॉडेलला जिल्ह्यातील बॅंकांनी व शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात. व त्याचधर्तीवर शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यावेळी बैठकीत पंतप्रधान मुद्रा बॅंक योजनेच्या कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी घेतला. त्यानंतर मुद्रा बॅंक योजनेतून अंजली शेळके यांना फूड व्हॅनसाठी कर्ज दिले होते, त्या कर्जातून अंजली शेळके यांनी अतिशय सुसज्ज अशी फूड व्हॅन तयार केली असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

सातारा जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी ओळखून खाजगी संस्थाच्या मदतीने ठराविक कालावधीचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यात प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना संबंधित संस्थेच्या मदतीने विविध कंपन्यात, संस्थामध्ये नोकरी देण्यात येईल, हा आलेख बघुनच संबंधित संस्थेला अनुदान दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या बाबतीत स्वतः आपण यात लक्ष घालणार असून जिथे प्रशिक्षण सुरु असेल तिथे अचानक जावून पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील कौशल्य विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. युवकांमध्ये कौशल्य विकास घडवून त्यांना रोजगार देण्याचे काम जिल्ह्यात मिशन मोड मध्ये करावयाचे असल्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. आयडीबीआय बॅंकेकडून ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र चालवले जाते, त्यात विविध रोजगारपुरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. सातारा जिल्ह्यात याच स्वयंरोजगारासाठी खुप चांगला फायदा होतो आहे. मात्र या अभ्यासक्रमाची उपयोगीता तपासून त्यात स्थानिक गरजा लक्षात घेवून बदल करावेत. जे मुल इथले प्रशिक्षण घेवून बाहेर पडतात त्यातले कोण, कोणते व्यवसाय करत आहे याचे वेळोवेळी मुल्यमापन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी आजच्या बैठकीत दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)