सातारा : पिंपळवाडी ते कारागृह व्हाया जिल्हा रूग्णालय

प्रशांत जाधव 

मोबाईलचा रंजक प्रवास


कारागृहाच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह

सातारा – रविवारी सातारा जिल्हा कारागृहात सापडलेल्या मोबाईलमुळे कारागृहाचे सुरक्षा खरोखरच वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट आले आहे. संजय जाधव याच्याकडे सापडलेला मोबाईल त्याच्याच मुलाने तट भिंतीवरून टाकला असल्याचे तो सांगत असला तरी तो मोबाईल शनिवारी दुपारीच कारागृहात दाखल झाल्याची माहिती आहे. त्या मोबाईलचा पिंपळवाडी ते कारागृह हा प्रवास व्हाया जिल्हा रूग्णालय असाच झाल्याचे कारागृहातील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर “दैनिक प्रभात’ला सांगितले आहे.

सातारा कारागृहात सापडलेला हा काही पहिलाच मोबाईल नाही. यापुर्वी पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याकडे 24 फेब्रुवारी 2017 रोजी सापडलेला मोबाईल, त्यानंतर काही दिवसात कारागृहातील मुख्य गेटनजीक सापडलेला मोबाईल व संजय जाधव याच्याकडे सापडलेला मोबाईल असे साधारणपणे एक वर्षाच्या कालखंडात तीन मोबाईल सापडल्याने कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजय जाधव हा त्याच्या मुलाने तटावरून मोबाईल टाकल्याचे सांगत असला तरी बंदी उघडण्याअगोदर कारागृह सुरक्षेला घातक वस्तू तटावरून आल्या नाहीत ना? याची पाहणी करण्यासाठी तटाला फेरी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो दिसला नाही हे नवलच मानावे लागेल. त्यामुळे तटावरून मोबाईल आत आला हे संजय बोलतोय की शनिवारी जिल्हा रूग्णालयातून येताना संजयनेच मुख्य गेटमधून मोबाईल आणल्यामुळे कारागृह सुरक्षेचे वाभाडे निघतील या भितीने त्याला कुणी बोलायला भाग पाडतोय, याचा तपास केल्यास कारागृहातील या दुभत्यांना पोसणारा गवळी समोर येईल. मोबाईल आत कसा आला ते तपासात उघड होईलच. पण, कारागृहात जॅमर असताना आत आणलेला मोबाईलला रेंज कशी आली याचा तपास करणे आवश्‍यक आहे.

कारण यापूर्वी नीलेश घायवळ याच्याकडे सापडलेल्या मोबाईलचा पोलिस तपास एक वर्ष झाले तरी पूर्ण नाही. मात्र कारागृह विभागाने तत्कालीन अधीक्षक नारायण चोंदे यांना किरकोळ दंड व कर्मचाऱ्यांची दोन वर्षाची पगारवाढ रोखत चौकशीचा फार्स उरकून घेतला होता. त्यामुळे या मोबाईल प्रकरणाची कसून चौकशी करावी म्हणजे कारागृहात जॅमर असतानाही कुणाच्या आशीर्वादाने संजय जाधव मोबाईल वापरत होता ते समोर येईल, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जॅमर फ्रिक्वेन्सी कमी कोण करतयं
कारागृहात बसवलेल्या जामरमुळे कारागृह परिसरातील नागरिकांचे मोबाईल चालत नाहीत. मात्र, कारागृहात कैद्यांचे मोबाईल चालतात हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल. त्यामुळे मोबाईल कसा आला याचा तपास तर व्हावाच पण जॅमरची फ्रिक्वेन्सी कोण कमी करतयं याचा तपास झाल्यास करागृहातील “त्या’ दुभत्यांना व त्यांना पोसणारा गवळी यांना अवघडल्यासारखे होईल.

यहा मुजरीम नही पैसा बोलता है
कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह विभागाने गतवर्षी एकूण 56 सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवले आहेत. मग तट भिंतीवरून टाकलेला मोबाईल कॅमेऱ्यात दिसला नाही का? कॅमेऱ्यावर पाहणीसाठी कायमस्वरूपी एक कर्मचारी आहे मग तो नेमका काय करत होता? जर संजय चार दिवसांपासून मोबाईल वापरत होता तर तो चार्जींग कुठे करत होता, मोबाईल कुठे लपवत होता हे सगळे यंत्रणेच्या मदतीशिवाय शक्‍य झाले असेल का? यावरून करगृहाचा “यहा मुजरीम नही पैसा बोलता है” असा कारभार सुरू आहे असे बोलले तर वावगे ठरू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)