सातारा पालिकेला 11.79 कोटीचा निधी मिळणार 

अमोल मोहिते; नगराध्यक्षांनी विकासकामांची यादी दिल्याने आंदोलन स्थगित 

सातारा – सातारा नगर पालिकेच्या लोकनियुक्‍त नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या निष्क्रीयतेमुळे सातारा पालिकेला मिळणारा सुमारे 11 कोटीचा निधी परत जाणार होता. मात्र नगर विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेवून नगराध्यक्षांनी सात दिवसांत विकासकामांची यादी निश्‍चित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

-Ads-

त्यामुळे नगराध्यक्षांनी वेळेत विकासकामांची यादी तयार करुन ती मुख्याधिकाऱ्यांकडे दिल्याने नगर विकास आघाडीने आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती नविआचे पक्षप्रतोद अमोल माहिते यांनी दिली आहे. दरम्यान, नविआच्या दणक्‍यामुळे परत जाणारा निधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून पालिकेला तब्बल 11 कोटी 79 लाखाचा निधी मिळणार आहे, असे मोहिते यांनी स्पष्ट केले.

पत्रकात मोहिते यांनी म्हटले आहे की, जिल्हा वार्षिक योजना 2018- 19 मधून नागरी वस्ती सुधारणा योजना, दलित्तेतर सुधारणा योजना व जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतील कामांसाठी पालिकेला निधी मिळतो. दि. 7 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर योजनेमधील कामे निश्‍चित करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. त्यानुसार विविध योजनांसाठी सुमारे 11 कोटी निधी मिळणे अपेक्षित होते. परंतु विकास कामांची यादी निश्‍चित करण्याबाबत नगराध्यक्षा कदम यांना रस नव्हता.

दि. 15 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर दि. 12 सप्टेबर 2018 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा पालिकेने एका आठवड्याच्या आत कामांचा प्रस्ताव सादर करावा.

प्रस्ताव सादर न केल्यास सातारा पालिकेसाठीचा निधी जिल्ह्यातील दुसऱ्या पालिकेला दिला जाईल, अशी सक्‍त ताकिद सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली होती. पण, नगराध्यक्षांची कामांची यादी देण्यास टाळाटाळ सुरु होती. सदर कामांची यादी तातडीने देवून शासनाचा निधी पालिकेला मिळावा, अशी विनंतीवजा मागणी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दि. 6 ऑक्‍टोबर 2018 रोजी नगराध्यक्षांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

याला 1 महिना उलटून गेला तरी, या नगराध्यक्षा सौ. कदम यांना काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत होते. सातारा शहराच्या विकासासाठी मिळणारा निधी परत जावू नये, शहतील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी नगरविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेवून नगराध्यक्षा सौ. कदम यांना सात दिवसांचा अल्टीमेटम दिला होता.

पक्षप्रतोद मोहिते यांनी पत्रक काढुन नगराध्यक्षा कदम यांच्या निष्क्रीयतेवर जोरदार हल्ला चढवून सात दिवसांत कामांची यादी न दिल्यास कदम यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नगर विकास आघाडीच्या आक्रमक भुमिकेमुळे कदम यांना आपली चूक कळून आली आणि त्यांनी सात दिवसांच्या आत विकासकामांची यादी निश्‍चित केली. त्यामुळेच नविआने आंदोलन मागे घेतले असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नविआच्या आक्रमक भुमिकेमुळे पालिकेचा परत जाणारा निधी मिळणार असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेसाठी 3 कोटी 84 लाख, दलीतेत्तर सुधारणा योजनेसाठी 1 कोटी 29 लाख 85 हजार, रस्ते अनुदान मधून 2 कोटी 2 लाख 11 हजार आणि नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) मधून 4 कोटी 65 लाख 32 हजार असा सुमारे 11 कोटी 79 लाखाचा निधी पालिकेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पालिकेला विकासकामांसाठी निधी मिळण्यासाठी आंदोलनाची गरज भासू नये याचे भान ठेवून नगराध्यक्षांनी आपली जबाबदारी ओळखून शहराच्या विकासासाठी काम करावे. चूकीचे काम केले तर, नविआ आंदोलनाचे हत्यार उपसेल, असा इशारा मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)