सातारा पालिकेचा कचरा उचलणारा “कॉम्पॅक्‍ट’ कोमात

हजारो रुपयांचा खर्च पाण्यात : दुर्गंधीने नागरिक हैराण
सातारा,  (प्रतिनिधी) –
पाणी आणि रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे सातारा पालिकेचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच सातारा आघाडीचे अध्यक्ष खा. उदयनराजे भोसले यांनी कचऱ्याच्या प्रश्नांवरून आणि कॉम्पॅक्‍ट बिघाडावरून अधिकारी, नगरसेवकांची खरडपट्टी काढली होती. माझी निवडणूक आली आहे, लोकांची कामे तुम्हाला जमत नसतील तर मला सांगा असा दम भरला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. पंधरा दिवसही उलटले नाहीत तोच कचरा उचलणारा “कॉम्पॅक्‍ट’ पुन्हा नादुरुस्त झाल्याने कोमात गेला आहे. दुरुस्तीवर झालेला हजारोचा पाण्यात गेला आहे.
दरम्यान शहरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून कचऱ्याच्या दुर्गंधीयुक्त वासाने नागरिक हैराण झाले आहेत. नेत्यांनी कितीही सूचना केल्यावर तेवढ्या पुरते पालिकेचे दल हलते. नंतर मात्र सातारा पालिकेचा कारभार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असाच सुरू असल्याचा प्रत्यय नेत्यांसह नागरिकांनाही येत आहे. खा. उदयनराजेंनी सुचना करूनही अधिकाऱ्यांकडून अमंलबजावणी होत नसल्याचे बोलले जात आहे.
सातारा शहरातील कचरा उचलण्याचा ठेका साशा कंपनीला दिला आहे. त्यासाठी पालिका ठेकेदाराला दरमहा लाखो रुपये मोजत असते. तरीही सातारा शहर कचरा मुक्त झालेले दिसत नाही. स्वच्छतेच्या नावाखाली पालिकेकडून केवळ दिखावा केला जात आहे. मात्र शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसतात पण स्वछता होत नाही. त्यात पडणाऱ्या पाऊसामुळे कुंडीतील कचऱ्याला दुर्गंधी सुटली आहे. कचरा कुंडीतील कचरा उचलला गेला नसल्याने त्या कचऱ्यावर मोकाट कुत्री ताव मारत आहेत. ही कुत्री कचरा रस्त्यावर विस्कटून टाकत आहेत. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्याच्या अंगावर ही मोकाट कुत्री धावून जात आहेत. कचराकुंड्यात पावसाचे पाणी साचून तो कचरा वास मारत आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेने शहर कचरा व कुंड्यामुक्त करण्याचा इरादा केला आहे. शहरातील कचरा कुंड्याच्या ठिकाणी कचरा कुंडीमध्ये कचरा टाकल्यास 100 रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे फलक लावले आहेत. मात्र कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या या जास्तवेळ एकाठिकाणी थांबत नसल्याने आजही कचरा कुंड्यामध्येच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे सातारा शहर हे केवळ कागदावरच कचरा व कुंड्यामुक्त होणार असे चित्र सध्यातरी शहरात पहावयास मिळत आहे.

सातारा पालिकेचा कचरा उचलणाऱ्या कॉम्पॅक्‍टमध्ये काही दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. त्यावरून खा. उदयनराजे भोसले यांनी पालिका अधिकारी आणि सातारा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकाची बैठक घेऊन शहरातील कचऱ्यावरून खरडपट्टी काढली होती. कॉम्पॅक्‍ट बिघडला म्हणून शहरातील कचरा उचलला गेला नाही अशा सबबी यापुढे एकूण घेतल्या जाणार नाहीत असा दम भरला होता. या बैठकीला पंधरा दिवसांचा कालावधीही होऊन गेलेला नाही. पुन्हा कचरा उचलणारा कॉम्पॅक्‍ट बिघडल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने पडणाऱ्या पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. नेत्यांनी कानऊघाडणी केली की, तेवढ्या पुरते पालिकेचे दल हलते. नंतर सातारा पालिकेचा कारभार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असाच सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)