सातारा : निवडणूक आली की नारळ हातात

असे लोकप्रतिनिधी होणे नाही


आ. शिवेंद्रसिंहराजेंची घणाघाती टीका

सातारा: जनतेने निवडून दिलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला पाच वर्ष काम करण्याची संधी मिळते. साताऱ्यातील काही लोकप्रतिनिधींची तऱ्हा मात्र निराळीच असते. निवडूण आले की, चार वर्ष अज्ञातवासात राहणार आणि पुन्हा निवडणूक तोंडावर आली की, हातात नारळ घेवून गल्लोगल्ली फिरणार आणि काम दुसऱ्याचे पण, मी केल, मी केल अशी घोकमपट्टी करत सातारकरांचा आपल्याला किती पुळका आहे हे दाखवत सुटणार. असे लोकप्रतिनिधी कधी झाले नाही आणि यापुढेही होणार नाहीत, अशी बोचरी टीका आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केली.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, 40 वर्षात भाऊसाहेब महाराज आणि त्यांच्यानंतर मी काय केले हे तमाम जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आम्हाला सत्ता मिळाली, हे आम्ही विसरत नाही. गेल्या 10- 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताना ज्या भागाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्या भागात आपण काय दिवे लावले? याचीही कबुली आपण दिली पाहिजे. केवळ घोकमपट्टी करुन आणि थापेबाजी करुन विकासकामे होत नसतात. टिका करायला फारशी अक्‍कल लागत नाही, त्याचप्रमाणे थापा मारायलाही फारशी अक्‍कल लागत नाही, हे साताऱ्यातीलच काही लोकप्रतिनिधींमुळे खरे ठरले आहे.

-Ads-

निवडणूका तोंडावर आल्या की हातात नारळ घेवून दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांचा शुभारंभ करायचा आणि लोकांचा बुध्दीभेद करण्यासाठी, खोटा कळवळा दाखवण्यासाठी दुसऱ्यांना नावे ठेवायची, हा नवीन धंदा सुरु करणाऱ्यांनी इंजिनियरने लिहीलेली कामाची यादी वाचून दाखवायची आणि ही कामे मीच केली, असा ढोल बडवायचा. स्वत: काही करायचे नाही पण, दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाच्या कोनशिलेवर माझे नाव लागले पाहिजे, हा अट्टाहास पुर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायचे. कामासाठी नाही तर फक्‍त नावासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायचे आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवायचे आता थांबले पाहिजे,असेही त्यांनी म्हटले आहे.

तीन- चार वर्षापुर्वी पालिकेतल्याच एका विद्वान वकिलाने साताऱ्यात पासपोर्ट ऑफिस येणार अशी बातमी पेपरमध्ये देवून मोठी दवंडी पिटली होती. पासपोर्ट ऑफिस साताऱ्यात आले पाहिजे. लोकांना सुविधा मिळालीच पाहिजे. चार वर्ष झाले तरी पासपोर्ट ऑफिस काय साताऱ्यात आले नाही पण, आता नव्याने हे ऑफिस साताऱ्यात येणार अशी पुन्हा बातमी तरी आली. पासपोर्ट ऑफिस, रेल्वे ऑफिस, विमानतळ अरे किती गाजरे दाखवणार आणि जनतेला भूलवणार, असा सवालही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे.

 40 वर्षात असली विकासकामे तर केली नाहीत..!
नेहमीच कुचकामी ठरलेल्यांना निवडणूक आली की, वेळ मारुन नेण्यासाठी हे नाही केले तर, मिशा काढीन. ते नाही केले तर, भुवया काढीन अशी डायलॉगबाजी करावी लागली आहे. मतांसाठी जनतेचा खोटा पुळका आलेल्यांनी 15 वर्षात काय केले हे एकदा जाहिर करणे अपेक्षित आहे. मात्र आम्ही 40 वर्षात काय केले यातच त्यांना फार इंटरेस्ट आहे. असो आम्ही 40 वर्षात काय केल हे सातारकरांनी पाहिलं आहे. पण, एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमीनीवर शिक्‍के मारुन त्यांना देशोधडीला लावणे यासारखी विकासकामे आमच्या हातून झाली नाहीत आणि होणारही नाहीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)