सातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा

बावधनसह बारा वाड्यातील शेतकऱ्यांची मागणी

गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया


टंचाईचा करावा लागणार सामना


शेवटचे आवर्तन न सोडल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती


वाई, (प्रतिनिधी)
नागेवाडी धरणातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्‍यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात असून संबंधित विभागाने तात्काळ धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी बावधनसह 12 वाड्यांमधील शेतकऱ्यांमधून होत आहे.
वाई तालुक्‍यातील मुख्य धरणांपैकी नागेवाडी हे एक धरण आहे. पाव टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या या धरणातून बावधनसह 12 वाड्यातील गावांना पाणीपुरवठा होता. साठवण क्षमता कमी असल्याने वर्षभर धरणातून पाणी पुरवठा करताना पाटबंधारे खात्याला तारेवरची कसरत करावी लागते. सध्या परिसरातील पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे नागेवाडीच्या धरणाच्या कालव्यातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास रब्बी हंगामातील हाता-तोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया
नागेवाडी धरणाला तीन ते चार ठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही पाटबंधारे खात्याकडून त्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने तात्काळ धरणाला लागलेली गळती काढून पाण्याचा होत असलेला अपव्यय थांबवावा, अशी मागणी होत आहे.

नियोजनशुन्य मत्सपालक
नागेवाडी धरणात मत्सपालन केले जाते. मात्र, या मत्सपालनाचे योग्य नियोजन होत नसल्याने पाण्यातच मासे मरत आहेत. त्यामुळे पाण्यालाही दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला आहे. या दुर्गंधीमुळे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागेवाडी धरणात होणारे मत्स्य पालन बंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.

धरणाची उंची वाढवा अन्‌ पोटपाटाची कामे करा
आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून बावधनसह बारा वाड्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तरीही पोट पाटाची कामे आजमितीला अपूर्णच आहेत. पोट पाटाची कामे पूर्ण झाल्यास पाच हजार हेक्‍टर जमीन ओलीताखाली येवू शकते. मात्र, धरणातील पाणी बारमाही शेतीला पुरेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे धरणाची उंची वाढवून धरण क्षेत्र वाढविण्यासाठी पाटबंधारे खात्याने प्रयत्न करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)