सातारा नगर वाचनालयात विविध उपक्रम

वाचकसंख्याही वाढली:कार्यवाह डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांची माहिती
सातारा:प्रतिनिधी
श्री.छ.प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचनालयात वर्षभर वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून वाचकसंख्या आणि ग्रंथसंख्याही वाढली असल्याची माहिती वाचनालयाच्या कार्यवाह डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी दिली आहे.
माध्यमांमध्ये वाचनालयाबाबत प्रसिध्द झालेल्या बातम्यांबाबत त्यांनी वाचनालयाची बाजु स्पष्ट केली.दरवर्षी वाचनालयाची वार्षिक सभा अतिशय शांततेत पार पडते. परंतु या वर्षी ही सभा उधळून लावायचा निश्‍चय काही मंडळींनी केला होता. पण आमचे वाचक सभासद आमच्यावर विश्‍वास असल्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊन सभेला उपस्थित राहिले. त्यामुळे या मंडळींना काहीच करता आले नाही असेही डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी म्हटले आहे.
या वाचनालयाला 165 वर्षांची परंपरा आहे. थोरले प्रतापसिंह महाराजांच्या व्यक्‍तिगत ग्रंथसंग्रहातून हे वाचनालय सुरू झालेले आहे. आज वाचनालयात सुमारे 1 लाख 20 हजार ग्रंथसंख्या आहे. 2300 सभासद आहेत. पूर्व भागातील लोकांची गैरसोय लक्षात घेऊन वाचनालयाचा शाखा तेथे सुरू केली आहे. तेथे 430 सभासद आहेत. तरूण पिढी वाचनालयाकडे यावी म्हणून आम्ही अल्प फी मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. सुमारे 200 विद्यार्थ्यी त्याचा लाभ घेतात. आज वाचनालयाने कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली असून पेन्शन योजना असणारे हे महाराष्ट्रातील एकमेव ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातही वाचनाची गोडी लागावी म्हणून 15 एप्रिल ते 31 मे या कालावधित विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचन विभाग चालवला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांकडून फी डिपॉझिट काहीही घेतले जात नाही. नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावावर 30 रू. चे पुस्तक त्याला वाचनालयातर्फे भेट दिले जाते. मुलांसाठी दरवर्षी निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यांची संख्या सुमारे 1600 ते 1700 पर्यंत गेली आहे अशी माहितीही डॉ. सौ. ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी दिली.

वाचनालयाला शासनाचा 1 आणि अन्य 2 असे 3 पुरस्कार गेल्या 3 वर्षात मिळाले आहेत. अर्थात हे सर्व वेळ देणाऱ्या संचालकांचे श्रेय आहे. वाचक व्यासपीठ हा साहित्यिक उपक्रम गेली 21 वर्षे सातत्याने वाचनालयात चालू आहे. एखादी संस्था अशा कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे मोठी होते, त्यावेळी तिच्यावर आपण संचालक झालो की आपली प्रतिष्ठा वाढेल या हेतूने संस्थेची बदनामी करणारे अनेक जण असतात.आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत. पण वाचनालयात 80 च्या घरात असणारे जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक आहेत, त्यांचा अपमान होउ नये अशी इच्छा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)