सातारा: देशमुखांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारु नयेत

प्रशासकीय कामांचे राजकारण कारू नका

प्रभाकर देशमुखांनी प्रशासकीय सेवेत असताना शेवटच्या टप्प्यात जलसंधारणाच्या कामासाठी पदरमोड न करता शासनाच्या व सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून माण-खटावला काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न त्यांच्या प्रशासकीय कामाचाच एक भाग होता.शेखरभाऊंनी कोणाचेही माध्यम न घेता स्वखर्चातून जलसंधारणाची अनेक कामे केली आहेत.पाणी फौंडेशनच्या कामासाठी विविध गावांत जावून हातात टिकाव, खोरे घेऊन श्रमदानाचे प्रदर्शन करण्यापेक्षा त्या गावांना मदत करत मशीनरी देऊन त्यात स्वत: तेल टाकण्याचे काम शेखरभाऊंनी केले आहे.

सौ. सुरेखाताई पखाले यांचा इशारा:पक्षश्रेष्ठींनी शेखरभाउंच्या मागे रहावे

बिजवडी – माण विधानसभा मतदारसंघात माझे बंधू व जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले सर्वसामान्यांचे नेते शेखरभाऊ गोरे यांनी निस्वार्थीपणे आपल्या कष्टातून कमावलेल्या पैशाचा निम्मा हिस्सा जनतेच्या विविध कामासाठी खर्चत स्वखर्चातून कोट्यावधी रूपयांची विविध विकासकामे केली आहेत..माण तालुक्‍यात राष्ट्रवादी पक्ष संपतोय की काय अशी एकवेळ परिस्थिती निर्माण झाली असताना शेखरभाऊंनी एकएक सत्तास्थाने ताब्यात घेत राष्ट्रवादीला वैभव प्राप्त करून दिले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत एकतर्फी विजय मिळवण्यासाठी शेखरभाऊंनी जनतेच्या विश्वासावर यशाचा प्लेटफॉर्म तयार करून ठेवलेला असतानाच प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले प्रभाकर देशमुख या प्लेटफॉर्मवर डोळा ठेवत असून त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करू नये असा कडक इशारा शेखरभाऊ गोरेंच्या भगिनी सौ.सुरेखाताई पखाले यांनी दहिवडी ता.माण येथे संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान दिला आहे.

माण विधानसभा मतदारसंघात एक-एक सत्तास्थाने मिळवत असताना शेखरभाऊंनी किती अडचणींचा सामना केला ते सर्वांना माहित आहे. कार्यकर्त्यांना किंवा सर्वसामान्य जनतेला पुढे न घालता स्वत: समोर येऊन अनेक कामे करून दाखवली आहेत.प्रसंगी त्यांनी निवडणूका जिंकण्यासाठी व पक्षवाढीसाठी स्वत:च्या अंगावर अनेक गुन्हेही ओढवून घेतले आहेत असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी दुटप्पी भूमिका न घेता पक्षवाढीसाठी ज्याने खरच प्रयत्न केले त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. आजपर्यंत अशा दुटप्पी धोरणांमुळेच पक्षाची वाताहात झाली होती. शेखरभाऊंनी ती वाताहात थांबवत माण तालुक्‍यात राष्ट्रवादी पक्षाला गतवैभव प्राप्त करत चांगले दिवस दाखवले आहेत.पक्षाला पडत्या काळात उभारी देण्याचे काम शेखरभाऊंनी केले असताना त्यांना ताकद देण्याऐवजी त्यांच्या मार्गात देशमुखांसारखे साप सोडण्याचे काम पक्षश्रेष्टींकडून होतान दिसून येत आहे. पक्षश्रेष्टी अशीच दुटप्पी भूमिका घेत राहीले तर ते पक्षाला हानीकारक ठरणार आहे,असेही त्यांनी म्हटले आहे.

वडूजला खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभेप्रसंगी अजितदादांची प्रमुख उपस्थित असताना सुरूवातीला मैदानात संख्या कमी होती.मात्र शेखरभाऊ आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह दाखल झाल्यानंतर मैदान तुडूंब भरले होते. त्यावेळीही निस्वार्थीपणे पदरमोड करून मोहिते पाटलांना मताधिक्‍य मिळवून देण्यात भाऊंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असे सांगून त्या म्हणाल्या,याच निवडणूकीच्या मतदानादिवशी पांढरवाडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतानाच विरोधकांशी झालेल्या वादात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आजही ती केस चालू आहे. हे सर्व शेखरभाऊ कोणासाठी करत होते फक्त राष्ट्रवादीच्या भल्याचा ते विचार करत होते. त्यानंतर आजपर्यंत मोहिते-पाटील यांच्याकडून एकाही कामाची अपेक्षा न ठेवता , त्यांच्या फंडाची मागणी न करता स्वखर्चातून कामे करण्यावर भर दिला आहे. खासदार मोहिते -पाटलांनाही विजयानंतर भाऊंची आठवण झाली नाही ही वेगळीच शोकांतिका आहे.

त्यामुळे एका दिवसात पक्षाच्या बॅंनरवर दिसलेल्या देशमुखांनी पक्षाबाबतचा कळवळा शेखरभाऊंना मदत करून दाखवावा असे ही शेवटी सौ.सुरेखाताई पखाले यांनी बोलून दाखवले.प्रभाकर देशमुखांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात पुणे येथे शरद पवार साहेबांनी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घ्यावी असे सूतोवाच केले होते. त्या पाश्वर्वभूमीवर त्यांनी खासदारकीची तयारी केली तर शेखरभाऊ त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील पण त्यांचा आम्ही तयार केलेल्या प्लेटफॉर्मवर डोळा असेल तर मात्र आम्ही हे खपवून घेणार नाही असेही त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)