मुख्यमंत्री साहेब एवढं कराच ….!

सातारा जिल्ह्यात मोठे उद्योग कधी येणार?

सातारा – सातारा जिल्ह्यात मोठे उद्योग उभारले जात नसल्याने बेरोजगारीची समस्या प्रचंड वाढली आहे. सातारा शहरालगत जुनी व नवीन एमआयडीसी असून, त्यामध्ये सध्या शेकडो छोटे-मोठे उद्योग सुरू आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी येथे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देणारे उद्योग आलेले नाहीत. गुणवत्ता प्रचंड प्रमाणात असतानाही साताऱ्याच्या एमआयडीसीचा वनवास संपलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या असलेल्या उद्योगांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन “एमआयडीसी’मध्ये देगाव फाटा येथून रस्ता आहे. मात्र, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. औद्योगिक वसाहतीमध्येही अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पथदिव्ये लावले असले तरी काही पथदिव्यांचे बल्ब खराब झालेले आहेत. एका ठिकाणी तर चक्क वेलींनी पथदिव्याचा खांब गुरफटून टाकला आहे. त्या लगतच वठलेले झाड आहे. ते पडून दुर्घटनाही होऊ शकते. सातारा जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षणात (ग्रामीण) देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मात्र, या “एमआयडीसी’त अक्षरश: जागोजागी कचऱ्यांचे ढीग साठलेले पाहण्यास मिळत आहेत.

“मास भवना’समोरही कचरा टाकण्यात आला आहे. एका मोकळ्या जागेत कचरा आणून टाकला जात असून, तेथेच तो पेटवून दिला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय, सार्वजनिक शौचालये नसल्याने रस्त्याकडेलाही नागरिक घाण करताना दिसतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय देगाव फाटा येथे असून, ते जुन्या पध्दतीच्या रचनेचे आहे.

कार्यालयाच्या मागे मोकळी जागा असून, त्याचा वापर होत नाही. कार्यालयाच्या समोरील जागेचेही सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. महामंडळाने सुधारणा करण्यास प्रारंभ केला, तर स्थानिक उद्योजकही त्यासाठी हातभार लावू शकतील. औद्योगिक वसाहतीमधील चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यालगत झाडे लावणे, पथदिवे बसविणे आदी कामे उद्योजक करू शकतील.

 

पडीक जागा ताब्यात घ्या 

एमआयडीसी स्थापन झाल्यानंतर अनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठी जागा घेतल्या आहेत. काही काळ तेथे उद्योग सुरू झाले. मात्र सध्या अनेक जागा पडून आहेत. त्यावर उद्योग सुरू नसल्याने महामंडळाचे नुकसान होत आहे. शिवाय, नवीन उद्योजकांना जागाही मिळत नाहीत. या जागांचा दुरुपयोग टाळण्यासाठी एमआयडीसी अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी काटेकोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अनेक सहकाऱ्यांसह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक विकास कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे. पण याशिवायही सातारकरांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.अनेक विषय प्रलंबित आहेत. घेतलेल्या काही निर्णयांची अंमलबजावणी प्रलंबित आहे. म्हणूनच सातारा जिल्ह्यातील इतरही समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत आहोत. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)