सातारा जिल्ह्यातील मान्यवरांकडून थोर नेत्याला भावपूर्ण आदरांजली

 अटलजींच्या निधनामुळे सौम्य मध्यममार्गी राजकारणाचा अस्त 
सातारा:माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सौम्य मध्यममार्गी राजकारणाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.सातारा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील मान्यवरांकडून या थोर नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

थोर विचारी तत्वनिष्ठ व्यक्‍ती
व्रतस्थ समाजकारणी आणि निष्कलंक राजकारणी म्हणून ख्यातकिर्त असलेले विलोभनीय व्यक्‍तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. सर्वार्थाने अतिशय दु:खदायक घटना भारतावर ओढवली आहे. सर्व भारतवासी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना थोर विचारी तत्वनिष्ठ व्यक्‍ती म्हणून ओळखत असत. त्यांच्या जाण्याने जुन्या पिढीतील कदाचित शेवटचा असणारा तारा निघळला. त्यांच्या दु:खद निधनाने देशाचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षापासून ते आजारी असल्याने सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर नव्हता, ते आहेत हा फार मोठा आधार सर्वांनाच होता, तो आधारही आज निसटला. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना – खा. उदयनराजे भोसले. 

-Ads-

अत्यंत चतुर राजनीतिज्ञ 
अटलबिहारी वाजपेयी यांना भारतातील अत्यंत चतुर राजनीतिज्ञांपैकी मानले जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या वाजपेयी यांची प्रतिमा सौम्य मध्यममार्गी अशीच कायम राहिली. वाजपेयी यांचे बालपण, कुटुंब, लहानपणापासून संघाशी एकरूपता, अभिजात वाङ्‌मय व काव्याची आवड, काही काळ डाव्या विचार चळवळींचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, वाजपेयी यांचे महाविद्यालयीन जीवन व राजकारणातील प्रवेश, 1955 पासून संसदेतील त्यांचा वावर, त्यांची प्रभावी भाषणे, नेहरू व वाजपेयी, वाजपेयी-मधोक, वाजपेयी- इंदिरा गांधी यांचे संबंध, 1973 ते 1977 मधील खळबळजनक वर्षे, आणीबाणी, त्यानंतरचे भारतीय राजकारणातील वाजपेयी यांचे नेतृत्व, त्यांचे वक्तृत्व, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची विचारसरणी, भाजपच्या सत्तेच्या काळातील घटना या सर्वांच्या स्मरणात राहणाऱ्या आहेत. अटलबिहारी यांच्या निधनाने जनसंघ व भारतीय जनता पार्टीचा माणसांना जोडणारा विश्वकोष हरपला आहे.
– विक्रम पावसकर जिल्हाध्यक्ष भाजप 

अजातशत्रू व्यक्‍तिमत्त्व 
लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी त्यांच्यावर अफाट प्रेम करणाऱ्या जनमाणसातून मिळाली. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना जनमानसातून लोकनायक ही पदवी मिळाली होती. अशा थोर नेत्याला आज लोक मुकले आहेत. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणात सुसंस्कृत म्हणजे अटलबिहारी असे समीकरण होते. सर्वमान्य व सर्वपक्षीय अजातशत्रू व्यक्‍तिमत्त्व असा लौकिक मिळालेले एकमेव अद्वितीय नेतृत्व आज आपल्यातून हरपल्याचे तीव्र दु:ख होत आहे.
ना. शेखर चरेगांवकर,
अध्यक्ष, सहकार परिषद. 

सर्वगुण संपन्न नेता हरपला 
देशातील एकमेव चतुरस्त्र निधर्मी आणि सर्वगुणसंपन्न नेतृत्व हरपले .अटलजींची भाषणे अत्यंत प्रभावी असायची.विरोधकांवर त्यांनी केलेली टीका बोचरी होती पण जहरी नसायची. पेट्रोल लॉबीचा दबाव झुगारून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला . अमेरिकेचा दबाव झुगारून अणुबॉम्बची चाचणी घेत त्यांनी भारताची संरक्षण क्षमता सिध्द केली होती. अटलजी वाई येथे एका दौऱ्यावर आले असताना त्यांनी लक्ष्मणशास्त्री जोशींना सभेला येण्याची विनंती केली तेव्हा लक्ष्मण शास्त्रींनी पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून सभेला येतो असे सांगत अटलजींच्या सभेला उपस्थिती लावली होती अटलजींनी केंद्रीय रस्ते मार्गाचे केलेले विस्तारीकरण देशाच्या प्रगतीचे द्योतक आहे असा सर्वगुण संपन्न नेता हरपल्याने भारतीय जनता पार्टीचे नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे .
डॉ. दिलीपराव येळगांवकर माजी आमदार . 

लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी 
अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा यांच्यापासून अटलजी मैलोन्‌ मैल दूर होते . ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग आला नाही. वडिलधाऱ्याच्या मायेने त्यांनी सर्वांवर प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाचा अजातशत्रू चेहरा होता .अनेक विषयांवर त्यांचा व्यासंग दिसत असे . अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे एनडीए मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली आहे.
अनिल देसाई भाजपा नेते 

संवेदनशील मनाचे कवी नेते 
अटलबिहारी वाजपेयी हे अजातशत्रू आणि संवेदनशील मनाचे कवी नेते होते. त्यांची राजकारणाची दृष्टी खूपच व्यापक होती त्यामध्ये कोणताही आकस नव्हता. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उभारणीसाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्या कुशल आणि मार्गदर्शक विचारांवर आमच्या सारख्या तरूण सदस्यांची पिढी पोसली गेली आहे. चोवीस दलांचे नेतृत्व करत देशाचा कारभार चालवताना अटलजींनी आंतरराष्ट्रीय राजकारणात छाप सोडली. अटलजी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सिद्धी पवार नगरसेविका भाजप सातारा नगरपरिषद 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)