संदीप राक्षे
तांबडा पांढऱ्याचा कोल्हापुरी हिसका सातारच्या नगरसेवकांना
सातारा : पश्चिमच नव्हे तर दक्षिण महाराष्ट्रातही भाजपची पाळमुळं रूजवणारे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विरोधकांना धोबीपछाड देणारे दबंग राजकारण सुरू केले आहे. कोल्हापूरच्या तावडे कॉलनीतल्या अतिक्रमणांचा विषय असो किंवा साताऱ्यातील अंर्तगत दुफळीचा विषय असो चंद्रकांत दादांनी आपली मि क्लीनची मवाळं प्रतिमा बाजूला ठेउन महाराष्ट्रातला पॉवरफुल नेता बनण्याचे जोरकस प्रयत्न चालवले आहेत. साताऱ्याचे विरोधात जाऊ पाहणारे अंर्तगत राजकारण व कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी भाजप विरोधकांची मोट बांधण्याचे चालवलेले प्रयत्न यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांचा त्रागा वाढल्याचे जाणवत आहे.
कुटुंबाला ना राजकारणाची कोणती पार्श्वभूमी, राजकारणाचा पाया विस्तारण्यासाठी ताब्यात ना सहकारी संस्था. वडील मुंबईत गिरणी कामगार, उमेदीच्या काळात चंद्रकांत पाटील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या संपर्कात आले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पूर्णवेळ कार्य करताना त्यांनी संघटन कौशल्य सिद्ध केले. अभाविप ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष अशी मजल मारणाऱ्या आमदार चंद्रकांत बच्चू पाटील महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून विराजमान झाले.
पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि एका विशिष्ट ध्येयाने केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषदेपासून पार ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोन्ही कॉंग्रेसची सत्ता. अशा स्थितीत भाजपला शाखा उघडणेही अवघड.
कार्यकर्तेही मोजकेच यामुळे पक्षाला महापालिका, नगरपालिका निवडणुकीतही उमेदवार मिळणे दुरापास्त. अशा अवस्थेत साखर कारखानदारीच्या या भूमीत भाजपचे कमळ फुलविण्याचा ध्यास चंद्रकांत पाटील यांनी घेतला.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकीय खेळीला जशास तसे उत्तर देताना पाटील यांनी दोन्ही पक्षांतील नाराजांना हेरून भाजपमध्ये दाखल करून घेतले. ज्या ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही तेथे उसना उमेदवार उभा करत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात भाजपच्या तिकिटावर उमेदवार निवडून आणण्याची खेळी यशस्वी करून दाखवली.
महाराष्ट्रतल्या सातारा व कोल्हापूर छत्रपतींच्या दोन्ही लढवय्या भूमीत चंद्रकांत दादांचे जोरकस राजकारण सुरू असताना कोल्हापुरात शरद पवारांनी केलेली डिनर डिप्लोमसी भलतीच चर्चेत राहिली. तावडे कॉलनीतल्या अतिक्रमणांच्या कारवाईत दादांनी हस्तक्षेप केल्याच्या विरोधकांच्या आरोपांमुळे दादांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यात म्हणजेच थोरल्या पवारांच्या राज्यात राष्ट्रवादीला पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी कराड दक्षिण कराड उत्तर व माण तालुकयात चंद्रकांत दादांनी रसद पुरवण्यासाठी पुन्हा पक्षाध्यक्षांकडे शब्द टाकल्याची खास चर्चा आहे.
मात्र साताऱ्यात कार्यकर्त्यांची. दुभंगलेली फळी कशी एकत्र आणायची हा मोठा पेच आहे. मर्जीतला स्वीकृत नगरसेवक आणि गटनेत्यांचे उपद्व्याप यामुळे चंद्रकांत दादांचा पारा अलीकडच्या उन्हाच्या तलखी प्रमाणे वाढलेलाच असतो. त्यामुळे जिल्हाध्यक्षांना थेट राजीनामा मागण्याची तंबी देउन दादांनी सगळ्यांचेच कान धरले आहेत. कोल्हापूरला गुरूवारी शासकीय विश्रामगृहांमध्ये साताऱ्याच्या सहा नगरसेवकांची दादांनी चांगलीच झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे.
पाटील यांनी सलग तेरा वर्षे अभाविपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले. संघटन कौशल्य आणि समर्पित वृत्तीने काम करण्याची वृत्ती यामुळे संघटनेने त्यांच्यावर अभाविपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपविली. भाजपने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविल्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत त्यांनी नियोजनबद्धरीत्या पक्षाचा पाया विस्तारला. मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले. मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर पाटील यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
संघटनात्मक कामात अधिक रमणाऱ्या चंद्रकांत पाटील आता थेट मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. या पुण्याईवर आणि पक्षाच्या बांधणीत सारेच ग्रह कोल्हापूर व साताऱ्यात विरोधात जाण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरची पकड सोडायची नाही याकरिता मवाळ वाटणाऱ्या दादांनी तांबडया पांढऱ्याचा कोल्हापुरी झटका द्यायला सुरवात केली आहे. त्याचा पहिला अनुभव साताऱ्याच्या भाजप नगरसेवकांनी घेतला हे नक्की.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा