सातारा क्रांती दिनाचा प्रशासनाला विसर

इतिहासप्रेमींची खंत, फाशीचा वड स्मारकाची दूरवस्था

गुरूनाथ जाधव 
सातारा: 8 सप्टेंबर हा सातारा क्रांती दिन म्हणून साजरा करण्याचा प्रशासनाला विसर पडला असल्याची खंत इतिहास संशोधन व संवर्धन करीत असलेल्या जिज्ञासू मंडळींनी व्यक्त केली आहे.

9 ऑगस्ट हा क्रांतीदिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. त्याच प्रमाणे 8 सप्टेंबर या दिवसाला देखील तितकेच महत्व आहे. हा दिवस फक्त साताराच नव्हे तर भारताच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. किमान सातारा जिल्ह्यात तरी तो साजरा व्हावा अशी इतिहासप्रेमींची इच्छा आहे. 1857 साली भारतात जे पहिले बंड झाले. त्याची ठिणगी साताऱ्यात पडली होती. सातारा गेंडामाळ येथील फाशीचा वड या ठिकाणी सतरा जणांना ईस्ट इंडिया कंपनीच्या न्यायमंडळाने शिक्षा सुनावली. तो खटला म्हणजेच सातारा राजद्रोहाचा खटला असे इतिहासात नमुद आहे. इंग्रज सरकारच्या अन्यायाला बळी पडून ज्या 17 वीरांना देहदंडाची शिक्षा सुनावली.

यामध्ये नारायण बापू पावसकर, केशव नीलकंठ चित्रे, शिवराम मोरेश्वर कुलकर्णी, विठ्ठल कोंडी वाकनीस, सीताराम रंगो गुप्ते यांना फाशी देण्यात आली होती. तर मुनाजी ऊर्फ बापू बाबर, सखाराम बळवंत शेटये, बाब्या नाथ्या गायकवाड, येशा नाथ्या गायकवाड, गणेश सखाराम कारखानीस, नाना उमाजी रामोशी यांना तोफेंच्या तोडी देण्यात आले होते. व रामजी बापूजी ऊर्फ रामसिंग चव्हाण, बाब्या हणगू रामोशी शिरतोडे, नाम्या माईक रामोशी, शिवाजी सोमाजी पाटोळे, पर्वती विठोजी पाटोळे, पाटलू येसू यांना गोळया घालण्यात आल्या होत्या. या हुतात्म्याच्या बलिदानाचे स्मरण म्हणून स्मारकाच्या ठिकाणी 8 सप्टेंबर हा सातारा क्रांती दिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी होत आहे.

सातारा राजधानीला 300 वर्षे पूर्ण झाले त्यानिमीत्ताने स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली फाशीचा वड या स्मारकाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. आज या स्मारकाची दुरावस्था झाली आहे. या स्मारकाच्या मुख्य स्तंभावरील मशालीची पडझड झाली आहे. तसेच येथील फाशीच्या वडाच्या भोवतालचा कठडा तुटला आहे. स्मारकाच्या परिसरात बसण्याची बाकडे देखील मोडकळीस आली आहेत. सर्व स्मारक परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. ज्या हुतात्म्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे इतिहास प्रेमीं व सातारकरांचे म्हणणे आहे.

कला व वाणिज्य महाविद्यालय व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 8 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9.30 हुतात्म्यांना मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सातारावासीयांनी गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)