सातारा : कात्रेवाडा टाकीवर आता कायद्याचं बोला

घाईघाईचे उदघाटन अडचणीचे ठरणार, विरोधकांची आता नवीन रणनीती

सातारा : रामाचा गोट परिसरातील कात्रेवाडा पाण्याची टाकी आता राजकीय संघर्षाला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बांधकाम पूर्णत्वाची तांत्रिक प्रक्रिया पार न पाडताच घाईघाईने टाकीचे उद्घाटन करण्याचे कारणच काय असा प्रश्न आता कायदेशीर रित्या विचारला जाणार आहे. भाजप व नगर विकास आघाडी यांनी आता कायद्याचे बोला म्हणण्याचा पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती पक्की केल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीचा कोणत्याच विकास कामाला विरोध नाही. अमृत योजनेतल्या टाक्‍यांचे उद्घाटन हे माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते होणार आहे. प्रोटोकॉल डावलून साविआने केलेली घाई योग्य नाही सिद्धी पवार नगरसेविका भाजप.

सातारा लोकसभा निवडणुकांना आता केवळ बारा महिन्यांचा कालावधी उरलेला असताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या होमग्राउंडवर सातारा पालिकेच्या राजकारणाला आंतरविरोधाची उकळी फुटू लागली आहे. भाजपचे नेते शासकीय विश्रामगृहात उदयनराजेंशी सूर जुळवण्याची चाचपणी करत असताना पालिकेत मात्र भाजपकडून वादाची भांडी विरोधात वाजू लागली आहेत.

कात्रेवाडा टाकीच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेवर सातारा विकास आघाडीच्या नामजंत्रीमध्ये निमंत्रक म्हणून चकक भाजप नगरसेवक सिद्धी पवार व विजय काटवटे यांची नावे परस्पर संमतीशिवाय टाकण्यात आल्याने अंर्तगत वाद चांगलाच भडकला आहे. सातारा विकास आघाडीच्या या बुद्धीभेदाची दखल भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीकडून घेण्यात आली आहे.

टाकी उद्घाटन म्हणजे घरचा सत्यनारायण नव्हे
सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविकेच्या पतीने टाकीच्या ठेकेदाराला हाताशी धरून कोणत्याही तांत्रिक परवानग्या नसताना स्वतः कार्यक्रमाचा मुख्य संकल्प क म्हणून टेंभा मिरवून घेतला. अगदी घरगुती सत्यनारायण घालावा तशा पद्धतीने पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची परवानगी न घेता अमृत योजनेचा शासकीय कार्यक्रम थाटात उरकण्यात आला असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे कात्रेवाडा टाकीचे पाणी टाकीत पडण्याआधीच पेटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

आता कायदयाच बोला
साविआच्या या चतुर खेळीवर भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेउन त्रागा व्यक्त केला होता. या विषयावर सत्ताधाऱ्यांना कायदेशीर जाब विचारण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत. त्याकरिता कायदेशीर कुमक कामाला लागली असून लवकरच याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे विजय काटवटे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)