सातारा : ऐतिहासिक खलबतखान्याला अवकळा

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर

सातारा: साताऱ्याचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेल्या तख्ताच्या वाड्यातून मराठी साम्राज्याचा साम्राज्य विस्तार झाला. या जागी पालिकेने विकसीत केलेल्या शाहू उद्यानात आजही या वाड्याच्या मुक खुणा अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक असलेल्या खलबतखान्याची दोन्ही प्रवेशद्वारे (भुयारे) उद्यानातील कचरा टाकून बुजवण्यात आली असून त्याचे पुनर्जीवन करण्याची मागणी जोर धरत आहे. छत्रपती घराण्यातील वंशज सध्या खासदार-आमदार असल्यामुळे शहरातील ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन होणार का, हा सवालही उपस्थित होत आहे.

स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिव नातु आणि शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी किल्ल्यावरील राजधानीचे ठिकाण सपाटीवर आणताना अदालतवाडा, रंगमहाल आणि तख्ताचा वाडा अशा तीन मोठ्या वास्तू त्या सुवर्णकाळात उभारल्या. त्यापैकी रंगमहालाची एक बाजू (जिथे सध्या कूपर कारखाना आहे) व्यवस्थित आहे. अदालतवाडाही शाही कुटुंब राहत असल्याने अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. मात्र, ज्याठिकाणी तख्ताचा वाडा होता त्याठिकाणी पालिकेने छ. शाहूंच्या नावानेच उद्यान विकसीत केले आहे. हे करत असताना या वाड्याच्या महत्वपूर्ण मुक खुणा आजही तिथे अभिमानाने उभ्या आहेत. त्यापैकी तख्ताच्या विहीरीला संरक्षण दिले आहे तर खलबतखान्याची प्रवेशद्वारे गेल्या काही वर्षांपर्यंत दिसत होती.

मात्र काही महिन्यांपासून या प्रवेशद्वारांवर उद्यानातील कचरा टाकून चक्क ही प्रवेशद्वारेच बुजवण्यात आली आहेत. तख्ताच्या वाड्यात जेव्हा खुद्द स्वराजाचे तिसरे छत्रपती राहत असत,त्यावेळी अत्यंत गुप्त अशा मसलतीसाठी आणि यदाकदाचित शत्रुंचा हल्ला वाड्यावर झाला तर राजकुटुंब सुरक्षितपणे राहावे याकरिता अशी तळघरे बांधण्यात येत होती. असाच एक खलबतखाना आजही छ. शाहू उद्यानात आहे. या खलबतखान्यात प्रवेश करण्यासाठी दोन उतरत्या कमानीची प्रवेशद्वारे आहेत.

गेल्या काही महिन्यापर्यंत ही प्रवेशद्वारे त्याच्या कमानीसहीत दिसतही होती. मात्र, गेल्या काही महिन्यात उद्यान साफ करणाऱ्यांनी हा कचरा याठिकाणी टाकल्याने ही प्रवेशद्वारे मुजली आहेत. विशेष म्हणजे हा कचरा येथे जाळण्यातही आला आहे. या ठिकाणाची तातडीने स्वच्छता करणे आवश्‍यक आहे. अन्यथा हा ठेवा काळाच्या उदरात गडप होण्याची शक्‍यता आहे. खरेतर हा वारसा जपताना हा ऐतिहासिक ठेवा लोकांसाठी खुला केल्यास मराठी जनतेला तो पाहता येईल आणि साताऱ्याचे वेगळेपण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढेल. पण ही राजकीय इच्छाशक्ती सध्या राज्य करणाऱ्यांना आहे का, हा प्रश्नच आहे.

मोनेंनी सामाजिक भान जपावे
या बागेच्या देखभालीचा ठेका माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अशोक मोने यांच्या शकुनी गणेश ट्रस्टकडे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विक्रमीवेळा निवडून येणाऱ्या मोनेंनी सामाजिक भान जपत आपले कर्तव्य पार पाडताना तातडीने हा ठेवा संवर्धन करताना खुला करण्यासाठी पाठपुरावा करावा अन्यथा जनआक्रोश पालिकेतील विरोधीनेत्यालाही पहावा लागणार, हे लक्षात घ्यावे.पालिकेतल्या ठेक्‍यावर गळे काढणारे मोने साहेब गुरुवार बागेतल्या ऐतिहासिक वास्तूच्या उपेक्षित पणाबद्दल चकार शब्द काढत नाही याचे मोठे वैषम्य सातारकरांना आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)