सातारा : उपकेंद्र नावाला अन्‌ कर्मचारी मिळेना गावाला!

चाफळ- पाटण तालुक्‍याच्या चाफळ विभागात आरोग्य सेवेचा बोऱ्या उडाला आहे. वाघजाईवाडी (चाफळ) ता. पाटण येथे उपकेंद्राची इमारत आहे. परंतु येथे कायमस्वरुपी कर्मचारी नेमणुकीस नसल्याने ग्रामस्थांना आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत. परिणामी रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घेत आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकुणच उपकेंद्र नावाला कर्मचारी मिळेना गावाला! अशी अवस्था उपकेंद्राची झाली आहे. याकडे आरोग्य विभागातील अधिकारीही सोईने पाहत असल्याने दाद तरी मागायची कोणाकडे? असा प्रश्न येथील जनता विचारु लागली आहे. या उपकेंद्रास कायमस्वरुपी कर्मचारी न मिळाल्यास वेळप्रसंगी आंदोलन करुन उपकेंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

वैद्यकीय उपकेंद्रास कायमस्वरुपी कर्मचारी नाहीत, ते मिळावे यासाठी वेळोवेळी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नाईलाजास्तव मग ग्रामसभेत ठराव घेवून वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरु केला आहे. सध्या उपकेंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे आजारी रुग्णांना खासगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे. उपकेंद्र बांधण्यासाठी आम्ही जमीन उपलब्ध करुन दिली, इमारत झाली, परंतु त्याच इमारतीला कारभारी मिळेना. शासनाने कायमस्वरुपी कर्मचारी न दिल्यास उपकेंद्राला टाळे ठोकुन तीव्र आंदोलन करणार आहे.
अशोक पवार
माजी सरपंच वाघजाईवाडी.

चाफळ, ता. पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत वाघजाईवाडी उपकेंद्राचा समावेश होतो. या उपकेंद्राअंतर्गत वाघजाईवाडी, मधलीवाडी, डेरवण, भैरेवाडी, शिंगणवाडी, बोर्गेवाडी आदी गावांचा समावेश होतो. दोन वर्षापूर्वी येथील आरोग्य सेविकेची बदली झाल्याने हे उपकेंद्र बंद अवस्थेत असते. वैद्यकीय सेवा ही अत्यावशक सेवा आहे. परंतु, ही सेवाच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागामध्ये वाढणाऱ्या बालमृत्यु व माता मृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान शासनाने सुरु केले. त्या अनुषंगाने शासनाने लाखो रुपयांचा निधी विविध योजनावर खर्च केला आहे.

रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या सर्व सुविधा या योजनांमुळे ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या. मात्र, उपलब्ध सुविधांचा वापर करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रामध्ये कर्मचारीच नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे. तसेच ग्रामीण रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.

सध्या वाघजाईवाडी उपकेंद्रास कायमस्वरुपी कर्मचारी नसल्याने रुग्णांची परवड सुरु आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कर्मचारी मिळावेत, यासाठी ग्रामसभेत ठराव संमत करत तालुका जिल्हास्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे. परंतु, याचे आरोग्य अधिकाऱ्यांना कसलेच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे. उपकेंद्रास कर्मचारी मिळावेत, याकरिता वारंवार मागणी करुनही अधिकारी कर्मचारी देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून रुग्णांची परवड थांबवावी, अशी मागणी केली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)