सातारा,पुण्यात घातपाताचा कट उघडकीस

सातारच्या सुधन्वा गोंधळेकरसह सनातनचे 3 साधक अटकेत

मुंबई:प्रतिनिधी

-Ads-

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात एका व्यक्तीच्या घरातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटके जप्त केली. विशेष म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. ही कारवाई एटीएसने गुरुवारी रात्री केली.त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी सुधन्वा गोंधळेकर हा सातारचा आहे.या कारवाईमुळे सातारा,पुण्यासह सोलापूर आणि नालासोपाऱ्यात घातपाताचा कट उघडकीस आला असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले आहेत. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही आढळून आली आहे. यात गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जाउ शकतात.

सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटके कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे. वैभव राऊतकडे स्फोटके असल्याची एटीएसला खात्रिशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, घरात स्फोटकांचा साठा आढळला. त्यानंतर पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.
या कारवाईनंतर एटीएसने डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम बोलावून सखोल तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केले. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास सुरु आहे.

नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथून सनातन संस्थेचा कथित साधक वैभव राऊतच्या मुसक्‍या आवळल्यानंतर आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली आहे. या दोघांपैकी एकाला नालासोपारा तर दुसऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.आज पहाटे वैभव राऊतला अटक करून त्याच्याकडून आठ देशी बॉम्ब, गन पावडर आणि डिटोनेटरचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला. या अटकेनंतर एटीएसने त्याची कसून चौकशी केल्यानंतर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. शरद काळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशी या दोघांची नावं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे दोघेही राऊतच्या संपर्कात होते. गावठी बॉम्ब बनविण्यासाठी या दोघांनी राऊतला मदत केल्याचं सूत्रांनी सांगितलं. या दोघांना अटक केल्यानंतर राऊत राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येणार आहेत. दोन ते तीन महिन्यापूर्वीपासूनचे हे फुटेज तपासण्यात येणार आहेत. त्यातून राऊतच्या घरी कोणाचं येणं-जाणं होतं. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, याची माहिती उजेडात येणार असल्याचं एटीएस सूत्रांनी सांगितलं. या दोघांव्यतिरिक्त राऊतच्या संपर्कात आणखी कोणी होते का? याचाही तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघांचा सनातनशी संबंध आहे की नाही याचाही तपास करण्यात येत आहे.

वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. त्याच्या घरी स्फोटके सापडणे शक्‍य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्‍य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी दिली.

 

गोंधळेकर सातारचा
वैभव राउतसोबत अटक करण्यात आलेला सुधन्वा गोंधळेकर सातारा येथील रहिवासी आहे.तो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.तसेच त्याचा सनातन संस्थेशी संबंध असल्याची माहितीही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

What is your reaction?
55 :thumbsup:
3 :heart:
3 :joy:
1 :heart_eyes:
9 :blush:
1 :cry:
9 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)