सातारच्या आयुषची दुबईत चमकदार कामगिरी

एकपात्री अभिनयाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक

सातारा –  दुबई येथे झालेल्या आठव्या कल्चरल ऑलिंपियाड ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌मध्ये सातारच्या आयुष मेहताने एकपात्री अभिनयाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. आयुष सध्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. या यशाबद्दल सातारच्या रंगकर्मींतर्फे आयुषचा सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर या “युनेस्को’शी संलग्न विभागाच्यावतीने या स्पर्धा 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून आयुष मेहता याची त्यासाठी निवड झाली होती. बहुभाषिक लघुनाटिका, गायन आणि वाद्यसंगीत, एकपात्री अभिनय आणि नृत्य या कलाप्रकारांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला होता.

केव्हिन कार्टर या दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्रकाराचे मुक्तचिंतन (मोनोलॉग) आयुषने सादरीकरणासाठी निवडले होते. उपासमारीमुळे मृत्यूशी झुंज देणारी सुदानमधील दोन वर्षांची मुलगी आणि तिच्या मरणावर टपलेले गिधाड यांचे कार्टर यांनी टिपलेले छायाचित्र जगभरात लोकप्रिय झाले होते. परंतु “परफेक्‍ट क्‍लिक’ मिळाल्यानंतर आपण त्या मुलीला मदत केली नाही, या जाणिवेने पश्‍चात्तापदग्ध झालेल्या कार्टर यांनी आत्महत्या केली होती.

हा पश्‍चात्ताप आयुषने आपल्या अभिनयातून ताकदीने उभा केला. सातारचे रंगकर्मी राजीव मुळ्ये यांनी आयुषला स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी दीपक देशमुख यांच्या हस्ते श्रीनटराजाची मूर्ती देऊन आयुषचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रकाश टोपे, राजेश मोरे, जितेंद्र खाडिलकर, चंद्रकांत कांबिरे, जगदीश पवार, नारायण पवार, शार्दूल टोपे आदी रंगकर्मी आणि आयुषचे कुटुंबीय उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)