सातारचे राजकारण तापले, मुख्याधिकार्‍यांनी महाबळेश्वर गाठले

चार दिवसांपासून सक्तीचा विजनवास : नगरपालिकेचे कामकाज रखडले

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) -सातार्‍याचा राजकीय ताप वाढलेला असताना सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे मात्र दबावाच्या विजनवासात गेले आहेत. हेरिटेज कमिटीच्या बैठकीचे निमित्त करणार्‍या गोरे साहेबांनी सलग चौथ्या दिवशी पालिकेकडे न फिरकता सरळ थंड हवेचे महाबळेश्वर गाठल्याची खात्रीशीर माहिती आहे. राजकीय दबाव असह्य झाल्याने साहेबांनी ही सक्तीची ट्रीप केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सध्या जुना मोटार स्टँन्डच्या तणातणी प्रकरणात बराच राजकीय मनःस्ताप सोसावा लागत असल्याची राजकीय वर्तुळात खसखस पिकू लागली आहे. त्याला दुजोरा देणार्‍या घटना सलग दोन दिवस पालिकेत घडत आहेत. एका नगरसेवकाच्या प्रस्तावावर सही घेण्यासाठी पालिकेच्या एका अधिकार्‍याला थेट मुख्याधिकार्‍यांचे निवासस्थान गाठावे लागले होते. तिथेही सगळेच कडीकुलूपात असल्याने त्यांना हात हालवत माधारी परतावे लागले होते. इंदौरच्या पंचतारांकित दौर्‍याला मान्यता मिळाली खरी पण या दौर्‍याला सातार्‍यात इतके राजकीय हेलकावे बसले की विचारता सोय नाही. विभाग प्रमुखांच्या बैठका रखडल्या, सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव रखडले गेल्या चार दिवसापासून मुख्याधिकारी शंकरराव गोरे पालिकेकडे न फिरकल्याने बहुतांश कामांचा खोळंबा झाला आहे.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या सोबतचा कम्युनिकेशन गॅप वाढल्याने पालिकेच्या दैनंदिन कामाचे गाडे खोळंबून बसले आहे. ’जलमंदिर’ चा ताण कसा सोसायचा याची भ्रांत गोरेंना पडल्याने त्यांनी पालिकेवर जवळपास बहिष्कारच टाकल्याची माहिती काही पदाधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आ. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांच्या दारूच्या दुकानाच्या अतिक्रमणावरून जोरदार वाद झाला.यात पोलिसांना खबरदारी म्हणून हस्तक्षेप करावा लागला. मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणात 52,53 च्या नोटीशीचे प्रकरण चुकीच्या सल्ल्याने राबवले गेल्याने खासदार उदयनराजे यांना बॅकफूटवर जावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. महाराजांचा राजकीय क्षोभ सोसायचा कसा या भीतीतून गोरेसाहेब गेल्या तीन दिवसापासून पालिकेतून गायब आहेत. ना रजेचा अर्ज, ना वरिष्ठांना कल्पना गोरे सध्या स्वतःला आलिप्त ठेउन बंद घरात आत्म कलेश करत असल्याची चर्चा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बनकर साहेब तेवढं मिटवून घ्या
उदयनराजे आणि प्रशासन यांच्यातला अदृश्य रिमोट म्हणजे अ‍ॅड दत्ता बनकर.तणातणीच्या प्रकरणात चुकीचा सल्ला दिला गेल्याने उदयनराजेंना बॅकफूटवर जावे लागले. गोरे महाराजांच्या गुडबुकमधून वगळले गेल्याची चर्चा आहे. उदयनराजेंचे निर्णय प्रशासनावर कसे लागू करायचे आणि महाराजांपुढे प्रशासनाला कसे सावरायचे यात बनकरांचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्यामुळे या सुध्दा प्रकरणात बनकरांनाच सर्व परिस्थिती मुत्सदीपणाने हाताळावी लागणार आहे.

अन् साहेब महाबळेश्वरमध्ये
जिल्हाधिकारी कार्यालयात न चुकता सध्या हजेरी लावणार्‍या गोरेंना सध्या पालिकेचे वावडे पडले आहे. सध्या उदयनराजे यांना गोरेंची सतत कामानिमित्त आठवण येत आहे. त्यांनी दोनदा पालिकेत चकरा मारल्या मात्र साहेब इतके ‘गोरें‘ मोरे झालेत की कुठल्या क्षणी काय घडेल याचा नेम नाही. सुप्रीम कोर्टाने रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके वाजवायला परवानगी दिली तरी सातारा आणि त्यातल्या त्यात उदयनराजे नियमाला अपवाद असतात. कोणाचे फटाके कधी आणि कसे वाजतील याचा नेम नाही. त्यामुळेच सातार्‍यात थांबायलाच नको म्हणून त्यांनी हेरिटेज कमिटीची महाबळेश्वरमध्ये होणारी बैठक गाठली. त्यामुळे सातार्‍यात ताप आणि थंड महाबळेश्वरात साहेबांना धाप असे म्हणण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)