सातारचा मानदंड आयुर्वेदीय अर्कशाला (भाग- २ )

ईवलेसे रोप
दोनच कामगार, तीन खल, एकच भट्टी, काहीशी पडलेली छोटीशी इमारत यावर अर्कशालेचे रोपटे लावले गेले. डॉ. मोरोपंत आगाशे यांना तेव्हा वैद्य रानडे, वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांनी सहकार्य केले. पण संस्था म्हटल की कधी उन्हाळा कधी पावसाळा कधी पावसाळा असतोच तसेच महायुद्धाच्या मंदीमुळे काही काळ आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या. त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लक्ष्मीबाई आगाशे यांची मन:पूर्वक साथ होती. त्यामुळे अशा अडचणीच्या काळी वेळपसंगी आपले दागिने देऊनही त्यांनी पतीच्या या बहुमोल कार्याथ साद दिली. डॉक्‍टरांची निष्ठा, त्यांच्या पत्नीची साथ आणि सहकारी वैद्यांचे सहकार्य याच्या बळावर त्या अग्निपरिक्षेतूनही अर्कशाला तावून सुलाखूून निघाली.

पब्लिक लिमिटेड कंपनीत रुपांतर
डॉ. आगाशे यांनी स्वत:च्या मालकीच्या अर्कशालेचे दि आयुर्वेदीय अर्कशाला लि. या लिमिटेड कंपनीत रुपांतर केले ते वर्ष होते 1941! अर्कशालेने नव्या युगाच्या नव्या पर्वात नवीन रुपाने प्रवेश केला. त्या काळी त्या काळी साताऱ्यासारख्या छोट्या गावात लिमिटेड कंपनी म्हणजे धाडस होते. त्याप्रमाणे साताऱ्यातील लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले व कंपनीनेने डॉ. आगाशे यांचे भांडवल शेअर्सच्या रुपाने परत केले. वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी हे कंपनीचे चेअरमन तर वैद्य दि. वि. बोडस मॅनेजिंग डायरेक्‍टर अणि रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले हे सेक्रेटरी होते तर साताऱ्यातील वैद्यकीय पेशातील अन्य मान्यवर संचालक होते.

सातारचा मानदंड आयुर्वेदीय अर्कशाला (भाग- १ )

अकोला, नांदेड, मुंबई, पुणे, कोल्हापुर, हुबळी, हैद्राबाद अशा ठिकाणी अर्कशालेची स्वत:ची विक्री केंद्रे सुरु झाली. आयुर्वेदातील गुणवत्ता म्हणजे अर्कशाला हे समीकरण रुढ झाले. डॉ. मो. ना. आगाशे यांच्या निधनानंतर त्यांचे सहकारी डॉ. भाऊराव आगाशे यांची चेअरमनपदी निवड झाली. तेही नामवंत ऍलोपॅथीक डॉक्‍टर होते. त्या काळात कंपनीचा लौकिक वाढतच राहिला परंतु आर्थिक घडी थोडीशी विस्कटली. डॉ. भाऊराव आगाशे व संचालकांनी वेळप्रसंगी वैयक्‍तिक तोशीस सोसूनही ती बिघडू दिली नाही.

डॉ. भाऊराव आगाशे यांच्यानंतर चेअरमनपदाची जबाबदारी सातारचे ज्येष्ठ समाजसेवक र. ना. तथा बन्याबापू गोडबोले यांच्यावर आली. त्यांना सुमारे 30 वर्षे संचालक पदाचा अनुभव होता. त्यामुळे चेअरमन झाल्यावर त्यांनी अर्कशालेची आर्थिक घडी नेटकेपणाने बसवली. वक्‍तशीरपणा, सौजन्यपूर्ण पण करारी व्यक्‍तिमत्व गुणवत्तेत तडजोड नाही, ही त्यांची वैशिष्टये त्यांच्या नेतृत्वाखाली अर्कशालेलाही प्राप्त झाली.

नवीन शतकाची नवी दिशा
मी अर्कशालेचे इन्कम टॅक्‍सचे काम त्यापूर्वी 30-32 वर्ष पहात होतो. ज्या संस्थेत भाऊ काका पदाधिकारी आहेत त्या संस्थेत आपण भाग घ्यायचा नाही हे तत्व मी काटेकोरपणाने पाळले होते. युनायटेड वेस्टर्न बॅंकेच्या चेअरमनपदावरुन भाऊ काका 1969 साली निवृत्त झाले. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी 1982 साली मी तेथे संचालक म्हणून गेलो होतो. त्यामुळे अर्कशाळेचे टॅक्‍सेशनचे काम जरी मी पहात असलो तरी त्या कामाव्यतिरिक्‍त तेथे कधीही फिरकत नव्हतो.

1998 ला माझे वडील भाऊकाका रा. ना. गोडबोले आजारी पडले तेव्हा त्यांनी निवृत्तीचा विचार व्यक्‍त केला. जेव्हा संचालक मंडळाने मला चेअरमन होण्याची विनंती केली. त्यामुळे मला त्या विनंतीचे आश्‍चर्य वाटले. मुलाकडे म्हणजे चि. उदयनकडे मी व्यवसायाची सुत्रे सोपविली होती आणि आता निवांतपणे वाचन. लेखन,, संगीत प्रवास अशा आवडीच्या छंदाकडे लक्ष द्यावे असा माझा विचार होता. त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. ही सातारकरांची जुनी संस्था असल्याने ती सांभाळून वाढवणे तुमचे कर्तव्य नाही का? असे म्हणत त्यांचा आग्रह व माझा नकार चालूच होता.

शेवटी भाऊकाकांना त्यांनी मध्ये घातल्यावर मी संचालक होतो, कामात लक्ष घालतो पण डॉ. हर्षे यांनाच चेअरमन होऊ दे असे सांगितले. डॉ. हर्षे माझे स्नेहीच होते व आहेतही. त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावून तुच चेअरमन हो असे बजावले व शेवटी मी पितृआज्ञा पाळून 1998 ला चेअरमन झालो.

चेअरमन पदाची कारकिर्द
एकदा जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यात पूर्णपणे झोकून काम करायचे या स्वभावामुळे मी कामाला लागलो. आर्थिक बाजू मला माहित होती. ट्रक व्यवसाय, प्रकाशन, सिनेमा असा अनेक उद्योगांचा अनुभव होता पण औद्योगिक आणि त्यातही आयुर्वेदिक औषधांचा अनुभव मात्र नव्हता त्यामुळे रोज दुपारी 3 ते 6 मी अर्कशाळेत जायचे आणि उत्पादन प्रक्रिया, खरेदी, विक्री मार्केटिंग आयुर्वेदाची मूळ सुत्रे यांचा अभ्यास करायचा हा क्रम सुरु केला. अधिकारी व कामगार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.

माझे ज्ञान वाढले व अर्कशालेची कार्यक्षमताही वाढू लागली. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधाचे उत्पादन मनात येईल त्या प्रमाणात वाढवता येत नाही कारण मुळ पाठच वेळखाऊ प्रक्रियेचे असतात. द्रव उत्पादनामुळे वाहतुकीत अडचणी येतात वगैरे प्रकारही समजले. त्यातून मार्ग काढण्यासीा म. य. लिमये डॉ. उदय देशपांडे, काणे वगैरेंचे अनुभव व सहकार्य उपयोगी पडले. याशिवाय चरक संहित, शारंगधर, सुुश्रुत, भैषज्य रत्नावली अशा कधीही नावसुद्धा न ऐकलेल्या आयुर्वेदीक मूळ ग्रंथांचा थोडा अभ्यास व बाकीची ज्येष्ठ वैद्यांशी चर्चा यातून माझ्या आयुर्वेदिक औषध निर्माण शास्त्राच्या ज्ञानात भर पडली. त्यातूनच मग काही नवीन उत्पादने काढता येतील का हा विचार झाला. बृहत वरुणादी काढा, अर्काफिट, आरोग्यरक्षक पेटी, अर्जुनकल्प ही नवीन प्रॉडक्‍टस थोडा गाजावाजा करुन लॉंच केली. त्यातील बहुतेकाना मोठे यश मिळाले.

सर्वोत्तम गुणवत्ता
ग्रंथोक्‍त पद्धतीने काटेकोररित्या उत्तमातील उत्तम कच्चा माल वापरुन तयार केलेली गुणवत्तापूर्ण औषधे हे अर्कशालेचे सातत्याने वैशिष्ट्य राहिले आहे. यांत्रिक खल आले तरीही 1000 वेळा खलायचे औषध आजही 1000 फेरे झाल्याशिवाय उत्पादन केले जात नाही. आसवांच्या बाबतीतही कोणतेही बाहेरुन अल्कोहोल न घालता सहा महिने सागवानी पिंपात ठेवून ती नैसर्गिकरित्याच पूर्णत: तयार केली जातात. रौप्य वा सुवर्णभस्मात घालावयाच्या चांदी किंवा सोन्यात गुंजभरही कमतरता कधीच केली जात नाही आणि त्यामुळेच अर्कशाला म्हटले की, गुणवत्ता वेगळी सांगावी लागत नाही.

सौहार्दपूर्ण कामगार संबंध
या सगळ्यांच्या मागे अर्कशालेचे कामगार स्टाफ, अधिकारी खंबीरपणे उभे आहेत. एखादे विशाल कुटुंब असावे तसे अर्कशालेचे वातावरण आहे. कामगारांपैकी जवळ जवळ 50 टक्‍के महिला वर्ग आहे. निवडणे, खलणे, चाळणे, गोळ्या करणे, पॅकिंग या सगळ्यात त्या आघाडीवर असतात. माझी सासू किंवा माझी आई अर्कशालेत होती किंवा माझा चुलता इथेच रिटायला झाला असे म्हणणाऱ्या महिला वा पुरुष कामगारांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या अर्कशालेत आहेत. कारखाना आपला आहे ही त्यांची भावना आहे. कायद्यानुसार द्यावयाच्या गोष्टी, मुलांना पुस्तके हे सुद्धा व्यवस्थापन करते. अर्कशाला ही आपल्या साताऱ्याचा मानबिंदू आणि आयुर्वेदाचा मानदंड आहे अशीच सर्व सातारकरांच्याप्रमाणे माझी भावना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)