सातारचा ग्रंथमहोत्सव एक अनोखी पर्वणी

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे : ग्रंथ घराला शहाणपण देतात

गुरूनाथ जाधव

सातारा – 
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग माणसाच्या जवळ आले. मोबाईल संगणकामुळे विश्‍वच हातात आले, पण मुले मात्र हाताबाहेर गेल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आज एकमेकांमधला सुसंवाद संपून नात्यामधला ओलावा आटत असल्याचे दिसत आहे. सोशल मिडीयाचा अतिरेकी वापर मानसिक संतुलन बिघडवू पाहत असताना मोबाईच्या छोट्या स्क्रिनलाच आपण चिकटून बसलो आहोत. यावर सर्वात चांगला पर्याय ग्रंथाचा आहे असे मत सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव कार्यवाहक प्राचार्य. डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवार दि. 4 ते 7 जानेवारी 2019 दरम्यान शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे नगरी जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमीत्ताने ग्रंथ महोत्सवाची उपयुक्तता याबाबत डॉ. यशवंत पाटणे यांनी दै. प्रभातशी बोलत होते. ते म्हणाले, सोशल मिडीयामध्ये पाहिलेले चित्र व मोबाईलवर वाचलेला विचार याचे आयुष्य अल्प असते.
ग्रंथ समोर ठेवून वाचलेला विचार आयुष्यभरासाठी ज्ञान, आनंद व समाधान देतो. ग्रंथातून वाचलेला विचार मनन प्रक्रियेला गती देण्यासोबतच जगण्याला नवीन उर्जा देतो. माणसाचे मन शेतीसारखे असते त्यात विचारायचे दाने पेरावे लागतात ते काम ग्रंथ करतात. उत्तम ग्रंथ हे आत्म्याचे सकस अन्न असते पण सध्या चटपटीत खाण्याकडे माणसांचा कल वाढायला लागल्यामुळे सकस अन्न डावलले जात असल्याचे दिसते.

तसेच ग्रंथांवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे ते ग्रंथांच्या सोबत येतीलच पण त्या पलीकडचा वाचक ग्रंथांच्या संगतीत येण्यासाठी त्याला वाचनाची गोडी लागण्यासाठी ग्रंथ महोत्सव मोलाची भुमिका बजावत आहेत असे सांगून डॉ.पाटणे म्हणाले, सातारा येथील जिल्हा परिषदेच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित केला जाणारा ग्रंथमहोत्सव वाचन संस्कृतीचा सोहळा असतो.

सर्व स्तरातील आबाल-वृद्ध तेथे येऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटतात. कित्येक जण वाढती गर्दी पाहून कुतूहलाने ग्रंथ दालनाला भेट देतात. ग्रंथ त्यांना खुणावतात साद घालतात. मला हातात घ्या म्हणून मागे लागतात. ग्रंथांची हाक वाचकांच्या मनाला भावते नि ग्रंथांचे त्यांच्या घरात आगमन होते. डॉ. पाटणे म्हणाले, फ्रीज टिव्ही यासारख्या महागड्या वस्तू घराला घरपण देत असतील पण ग्रंथ घराला शहाणपण देतात. घराला शहाणपण देणाऱ्या ग्रंथामुळे घराची ज्ञानश्रीमंती वाढते ही वस्तुस्थिती लक्षात घेतो का प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला.

ग्रंथ महोत्सवाचे पदाधिकारी मंडळी प्रत्येक वर्षी एक निश्‍चित कार्यक्रम तयार करतात. महाराष्ट्रातील ग्रंथ प्रकाशक वितरकांना निमंत्रित करून त्याचे स्टॉल उभारले जातात त्यामुळे येथे ग्रंथ जत्राच भरवण्यात येते. या ग्रंथमहोत्सव उपक्रमाचे प्रणेते तत्कालीन शिक्षणाधिकारी सातारा व सध्याचे शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर) दिनकर पाटील हे आहेत. कित्येक लहान मुले आपल्या पालकांकडे हट्ट करून त्यांना ग्रंथ महोत्सवाकडे ओढून आणतात. अनेक पालक आपल्या लेकरांचा वाढदिवस ग्रंथ खरेदीने साजरा करतात. ग्रंथमहोत्सवाच्या चार दिवसांच्या कालावधीत सुमारे दोन ते तीन कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी विक्री देखील होत आहे. वाचकांची वानवा नाही फक्त त्यांना ग्रंथांपर्यंत आणावे लागते आणि हे कार्य ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे.

ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांची आखणीसुद्धा त्यादृष्टीनेच होते. वाचक ग्रंथाकडे आकृष्ट होण्यासोबतच वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कथाकथन, काव्यवाचन, संगीत, गायन सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ग्रंथमहोत्सवाचा मांडव माणसांनी फुलून जातो. आजवर कविवर्य वसंत बापट डॉक्‍टर य. दि. फडके, द. मा. मिरासदार, सौ. विजया राजाध्यक्ष, डॉ. द. भि. कुलकर्णी , डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. शिवाजीराव भोसले, कविवर्य विठ्ठल वाघ, बॅ. पी. जी. पाटील, फ. मु. शिंदे अरुण दाते, जगदीश खेबुडकर, बाबा कदम, इंद्रजित भालेराव, डॉ. आनंद पाटील, डॉ. रामचंद्र देखणे आदींनी ग्रंथमहोत्सवात दमदार हजेरी लावली आहे,असेही ते म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)