सातमाळ डोंगर रांगेतील एक बलाढ्य दुर्ग रत्न किल्ले अहिवंत गड !

नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्व-पश्‍चिम पसरलेल्या सातमाळ डोंगर रांगेमध्ये एकुण 18 किल्ले आहेत. यापैकी एक प्रमुख किल्ला म्हणजे अहिवंत गड. नाशिक शहरापासून अहिवंत गडास एका दिवसात भेट देणे सहज शक्‍य आहे. अंतर आहे सुमारे 55 किमी. पुण्या-मुंबईच्या दुर्गप्रेमींनी आदल्या दिवशी गडाच्या पायथ्याला असलेल्या दरेगावतील हनुमान मंदिरात मुक्काम करावा आणि भल्या पहाटे किल्ल्याकडे कुच करावे.

दरेवाडी गावातून किल्ल्यावर जायला दोन प्रमुख वाटा आहेत. गावातील हनुमान मंदिराच्या मागील वाटेने सुमारे दीड तासात गडमाथा गाठता येतो. या तुलनेने दुसरा मार्ग खुप सोपा आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेले बेलवाडी आणि दरेगाव ह्या गावांना जोडणारी खिंडीची वाट अहिवंत गडाला खेटूनच जाते. ह्या मार्गाने जाताना किल्ल्याच्या साधारण अर्ध्या उंचीपर्यत गाडीने जाता येते. सुमारे 30-40 मिनिटांच्या सोप्या चढणीने गडमाथ्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा मोठा विस्तार, गडमाथ्यावर असलेले वाड्याचे धान्य कोठाऱ्यांचे अवशेष, कातळातील खोदीव अनेक गुहा, घोड्याची पागा, दोन मोठाली तळी हे सर्व दुर्गावशेष हे सिद्ध करतात कि अहिवंत गड एक प्रमुख लढाऊ किल्ला होता. किल्ल्यावर एक अष्टकोनी आकाराचे छोटेसे पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यायोग्य आहे. ह्या टाक्‍याशेजारी एक अश्वारूढ खन्डोबाची मूर्ती दिसते तसेच गडाच्या मधोमध एक हनुमानाची आणि वणीच्या सप्तशृंगीमाते प्रमाणे अष्टभुजा देवीची मुर्ती आहे. घोड्यांच्या पागेमधील घोड्याचे दावे बांधण्यासाठी डोंगरामध्ये कोरलेल्या खोबण्या, तलावांचे पाणी उताराकडे वाहुन जाऊ नये म्हणून पाण्याला घातलेला बांध असे मुद्दाम अभ्यासपूर्वक पहावेत असे दुर्गावशेष अहिवंत गडावर पहायला मिळतील. सर्व दुर्गावशेषांसोबत गड फिरायला सुमारे तीन तास तरी नक्की लागतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोघलांच्या ताब्यात असलेला अहिवंत गड छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये स्वराज्यात शामील केला. मराठ्यांनी मोघलांचे इतर अनेक किल्ले जिंकले. नंतर सुरतेवर हल्ला करून सुरत लुटली. या कारवायांनी संतप्त झालेल्या औरंगजेबाने महाबतखान या सरदाराला किल्ले परत मिळवण्याचा हुकूम केला. महाबतखानाने दिलेरखानासोबत अहिवंत गडाला वेढा दिला. महाबतखानाने किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने आणि दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे बांधणी केली. सुमारे एक महिना उलटला तरी अहिवंत गड मोघलांना दाद देत नव्हता. मात्र किल्ल्यातील दारुगोळा आणि धान्य संपत आल्यामुळे मराठ्यांनी किल्ला मोघलांच्या ताब्यात द्यायचे ठरवले. महाबतखान अतिशय तीव्र व त्वेषाने हल्ला करत असल्यामुळे मराठ्यांनी आपला दूत दिलेरखानाकडे पाठवून किल्ला सुपूर्त केला. अहिवंत गड एक प्रमुख किल्ला असल्यामुळे मोघल व मराठ्यांमध्ये किल्ला ताब्यात घेण्यासाठी नेहमीच संघर्ष झाला. अखेर 1818 साली किल्ला इंग्रजांनी जिंकला. दोन दिवसांचे वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोहनदरी आणि अचला हे अहिवंत गडाचे संरक्षक दुर्गसाथीदार देखील पाहता येतील. किल्ल्याचा मोठा विस्तार आणि अनेक अभ्यासयुक्त दुर्गावशेष गडावर उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी अहिवंत गडास नक्की भेट द्यावी.

– प्रसाद जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)