साडेसहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज:बावनकुळे

काळगाव – पश्‍चिम महाराष्ट्रात वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असून थकबाकीचे प्रमाण ही कमी असल्याने येथील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून साडेसहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मरळी, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. शंभूराज देसाई यांची उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. बावनकुळे म्हणाले, राज्यात एकूण 44 लाख शेतकऱ्यांपैकी 22 लाख शेतकऱ्यांना दिवसा तर 22 लाख शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. मात्र राज्यातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात वीजबिल थकबाकी व वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पंपासाठी आता मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येत्या पाच वर्षात गावोगावी या योजनेतून प्रकल्प उभारुन सहा रुपये ऐवजी केवळ 2 रुपये 60 पैसे या दराने वीजपुरवठा केला जाईल असे त्यांनी सांगितले.

महावितरण कंपनीला देखभाल दुरुस्तीसाठी आर्थिक निधी गरजेचा असल्याने राज्यातील थकबाकीदार शेतकरी आणि विजग्राहक यांनी किमान 30 टक्के तरी थकबाकी भरणे आवश्‍यक आहे. अन्यथा महावितरण आर्थिक अडचणीत येऊ शकते. याकरिता थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपली थकबाकी भरावी, असे आवाहनही ना. बावनकुळे यांनी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना केले आहे.

आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षाच्या काळात राज्यातील 5 लाख 18 हजार शेतकऱ्यांच्या शेती पंपांना वीज कनेक्‍शन दिले नव्हते. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्र असो वा उत्तर महाराष्ट्र असो असा कोणताही भेदभाव न करता राज्यातील 2 लाख 28 हजार शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज कनेक्‍शन नव्याने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून येत्या आठवड्याभरात देण्यात येणार आहेत. असे स्पष्ट करुन राज्यातील एका शेतकऱ्याला एक ट्रासफॉर्मर अशी योजना राज्यात कार्यान्वित केली असून आज या योजनेचा पश्‍चिम महाराष्ट्रातून शुभारंभ केला असल्याचे ना. बावनकुळे यांनी जाहीर केल्याचे सांगितले.

ना. बावनकुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना प्रकल्पाची पाहणी केली असून गेल्या पाच वर्षापासून कोयनेच्या 80 मेगावॅट प्रकल्पाचे बंद पडलेले काम पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाला आदेश देण्यात आले असून लवकरच त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर बैठक घेतली जाणार आहे. या प्रकल्पाला 20 ते 22 वर्षे झाल्यामुळे या प्रकल्पामध्ये अनेक मशीन बंद अवस्थेत असून काही जीर्ण होऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी 95 कोटी रुपयांचा निधी गरजेचा असून हा निधी राज्य शासन लवकरच देण्यासाठी कटिबध्द आहे.

तसेच पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी सुचवल्याप्रमाणे कोयना प्रकल्पातील 130 प्रकल्पग्रस्त आयटी आय झालेली युवक तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करुन वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत त्यांना सेवेत ठेवण्याचा आणि त्यांच्यासाठी 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय ही राज्य शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार देसाई यांनी डोंगरी विकास योजनेसाठी मागणी केलेल्या पाटण मतदार संघातील 11 कोटी 83 लाख रुपयांच्या विकासकामांना राज्याच्या हरित ऊर्जा प्रकल्पातून तातडीने मंजूरी दिली असून त्याचा धनादेश येत्या चोवीस तासात तातडीने बांधकाम खात्याकडे वर्ग केला जाईल, असेही ते शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)