साडेपाच लाख नागरिकांच्या घशाला कोरड

1 हजार 721 वाड्यावस्तांना 257 टॅंकरने पाणीपुरवठा


दिवसेंदिवस टॅंकरच्या संख्येत वाढ


प्रशासनाकडून खासगी 191 विहीरी ताब्यात

पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. विभागातील 1 हजार 721 वाड्या-वस्ता तहानलेल्या आहेत. या वाड्यावस्त्यांमधील सुमारे 5 लाख 40 हजार नागरिकांना 257 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाकडून खासगी 191 विहीरी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसांत दुष्काळी गावांच्या संख्येत आणि टॅंकरच्या संख्येतही वाढ होण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

राज्यात यावर्षी परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे सुरुवातीपासूनच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 243 गावांना टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू नाही.

विभागात सर्वांधिक टॅंकर सांगली जिल्ह्यात सुरू असून येथील 81 गावांतील 540 वाड्यावस्त्यांमधील 1 लाख 75 हजार 241 लोकांना 76 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यात 42, खानापूरमध्ये 6, तासगावमध्ये 3, कवठे महांकाळ तालुक्‍यात 6, आटपाडीमध्ये 19 आणि खानापूर तालुक्‍यात 6 टॅंकर सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यात 54, कोरेगाव तालुक्‍यात 8, कोरेगावमध्ये 8, फलटणमध्ये 2 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार नागरिकांना टॅंकरद्वारे तहान भागवावी लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 3, अक्‍कलकोटमध्ये 2 आणि करमाळा तालुक्‍यात 5, मंगळवेडा तालुक्‍यात 10, मोहोळ तालुक्‍यात 3, माळशीरसमध्ये 3, माढामध्ये 4 टॅंकर सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात 46 टॅंकरने 1 लाख 27 हजार नागरिक टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.

पुणे जिल्ह्यात 64 टॅंकर
पुणे जिल्ह्यातील 36 गावांतील 424 वाड्यांमध्ये 64 टॅंकर सुरू असून 1 लाख 25 हजार नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्‍यात 19, शिरूरमध्ये 17, आंबेगाव तालुक्‍यात 7, दौंडमध्ये 9, हवेलीमध्ये 1, इंदापूरमध्ये 1, पुरंदरमध्ये 3, जुन्नरमध्ये 3 आणि खेडमध्ये 3 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)