साडेतीन हजार विद्यार्थ्यांची मॅरेथॉन मुलाखात!

  • रोजगार मेळावा : मावळ तालुक्‍यात चाळीसहून अधिक कंपनींचा सहभाग

तळेगाव दाभाडे,(वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील चाळीसहून अधिक कंपनींनी साडेतीन हजार विद्यार्थ्यांची तळेगाव-दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात रोजगार मेळाव्यात मुलाखतीद्वारे निवड केली. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या ठिकाणीच नेमणूक पत्र देण्यात आले. आय. टी. आय., दहावी, बारावी, एम. सी. व्ही. सी., पदवीधर, पदव्युत्तर, इंजिनिअरींग, बी. बी. ए., बी. सी. ए., एम. सी.ए., एम. बी. ए., फार्मसी, नर्सिंग या क्षेत्रांतील विद्यार्थी उपस्थित होते.

इंद्रायणी महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, मावळ-भूषण, शिक्षण तज्ज्ञ व माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन कृष्णराव भेगडे यांच्या सत्कार करण्यात आला. रोजगार मेळाव्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, माजी आमदार दिगंबर भेगडे, हनुमंत नलावडे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. जैन, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे व मावळ तालुक्‍यातील 32 कारखान्यांतील व्यवस्थापक उपस्थित होते.

रोजगार भरती मेळाव्याचे उद्‌घाटन संस्थेचे कार्यवाहक व उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना काकडे म्हणाले, मावळ तालुक्‍याच्या सभोवती उद्योगांचा विकास झाला असून तळेगावाचे नाव जगाच्या नकाशावर झळकत आहे. जागतीक स्तरावरील बहुउद्देशीय कंपनींचे जाळे विस्तारत आहे. कंपनींना लागणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था मावळ तालुक्‍यामध्ये एकवटल्या आहेत. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने नजिकच्या भविष्यकाळात सुसज्ज प्लेसमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीनींच्या शैक्षणिक हिताचा विचार करत अद्ययावत विज्ञान महाविद्यालयाची इमारत बांधण्याचा मनोदय काकडे यांनी यावेळी व्यक्‍त केला.

रोजगार मेळाव्याचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ म्हणाले की, इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन संस्थेच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत बॅंकिंग व इलेक्‍ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स या अभ्यासक्रमासाठी शासनाने 16,50,000 अनुदान उपलब्ध करून दिले आहे. नगरसेवक किशोर भेगडे यांनी उद्योजकांसमोरील आव्हाने व कुशल मनुष्यबळ मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवकालीन दुर्मिळ अवजारे व शस्त्राच्या सामग्रीचे प्रदर्शन इतिहास विषयाचे प्रमुख डॉ. प्रमोद बोराडे यांनी आयोजित केले होते. रोजगार मेळावा व दुर्मिळ साहित्य प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालय व परिसरातील विद्यार्थ्यांनी घेतला. सूत्रसंचालन प्रा. के. व्ही. अडसूळ यांनी व आभार डॉ. एस. के. मलघे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)