खडकवासला प्रकल्प : एकूण साठा 72 टक्के
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 21.23 टीएमसी म्हणजे 72 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पात 4.42 टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे.
यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आणि धरणसाखळी परिसरात समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली. पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा होतो. टेमघर धरणात 0.16 टीएमसी, वरसगाव धरणात 11.27 टीएमसी, पानशेत धरणात 8.45 टीएमसी आणि खडकवासला धरणात 1.36 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून कालव्याद्वारे शेतीसाठी आर्वतन सुरू आहे.
टेमघर धरण लवकर रिकामे
टेमघर धरण दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. पावसाळ्यामध्ये धरण 80 टक्के भरले होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणाची दुरुस्तीचे काम बंद ठेवले होते. यंदा प्राधान्याने सर्वात आधी टेमघर धरणाचे पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. त्यामुळे टेमघर धरण यंदा लवकर रिकामे झाले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा