विविध हंगामांत कडधान्य, तृणधान्ये व गळीतधान्य पिके घेतली जातात. आपण चांगले उत्पादन घेत असलो तरी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकडे आपले दुर्लक्ष असते. नवीन धान्याची एकाच वेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्य तीन ते चार महिने साठवण करून, अपेक्षित बाजारभाव असताना बाजारात आणल्यास चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते.धान्य साठवणीच्या काळात धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीपासून साठवणीच्या धान्याचे संरक्षणार्थ उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते.

 कीड नियंत्रण सापळा वापर 

असा आहे कीड नियंत्रण सापळा – मुख्य नळी – स्टीलची एका बाजूला झाकण असलेली तीन सें.मी. व्यासाची पोकळ नळी आहे. या नळीवर दोन मि.मी. आकाराची छिद्रे आहेत. हा सापळा धान्यात ठेवल्यावर या छिद्राद्वारा किडी सापळ्यात अडकतात. 2) कीटक अडकणारी नळी – मुख्य नळीच्या एका बाजूला जोडण्यात आलेली प्लॅस्टिकची ही एक नळी आहे. या नळीला नरसाळ्याचा आकार देण्यात आलेला आहे. मोठा गोलाकार भाग मुख्य नळीला जोडला आहे. लहान गोलाकार भाग खालच्या दिशेने करण्यात आलेला आहे.3) या नळीला लहान गोलाकार भागात प्लॅस्टिकचा शंकू बसविण्यात आलेला आहे. ज्या वेळी धान्यातील कीड मुख्य नळीच्या छिद्रामधून आत येईल, त्या वेळी ती कीड अडकण्याच्या नळीमधून थेट शंकूमध्ये जमा होईल. ही नळी नरसाळ्याच्या आकाराची असल्यामुळे किडी तेथे अडकून न राहता सरळ शंकूमध्ये जमा होतात. या शंकूला आटे असून, किडी अडकण्याच्या नळीवर सहजपणे लावता व काढता येतो. हा शंकू गुळगुळीत प्लॅस्टिकचा असून, जमा झालेल्या किडींना बाहेर येता येत नाही. किडी त्यामध्येच अडकून राहतात.

सापळ्याची संकल्पना- कुठल्याही सजीवास जगण्यासाठी हवेची आवश्‍य कता असते, ही संकल्पना या सापळ्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. हवा मिळविण्यासाठी किडी धान्यात फिरताना त्यात ठेवण्यात आलेल्या सापळ्यात अडकतात.

सापळ्याची कार्यपद्धती –हा सापळा धान्यामध्ये पांढरा शंकू खाली येईल, अशा पद्धतीने उभा ठेवावा लागतो. वरचे हिरव्या रंगाचे झाकण हे धान्याच्या पातळीशी समान ठेवावे. किडी मुख्य नळीतील पोकळ जागेतील हवेकडे आकर्षित होतात. नळीच्या छिद्रांद्वारा कीड सापळ्यात प्रवेश केलेल्या किडी खालील बाजूच्या शंकूमध्ये पडून अडकतात. आठवड्यातून एकदा या सापळ्याचा शंकू काढून जमलेल्या किडी नष्ट कराव्यात. पुन्हा सापळा याच पद्धतीने धान्यात ठेवावा.

 सापळ्याची वैशिष्ट्‌ये – वापरण्यास सुलभ, आर्थिकदृष्ट्‌या परवडतो. देखभालीचा खर्च नाही, वर्षानुवर्षे वापरता येतो. कुठल्याही रासायनिक घटकांचा वापर नाही.

 कीड नियंत्रण सापळ्याचे निष्कर्ष – कीड सापळा वापरलेल्या धान्यामध्ये किडींची संख्या तीन पट कमी आणि किडलेल्या दाण्यांची संख्या 2.4 पटीने कमी दिसली. कीड सापळा न वापरलेल्या एक किलो धान्याच्या वजनामध्ये कीड सापळा वापरलेल्या धान्याच्या वजनापेक्षा 3.3 पट घट आढळून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)