साठवणीतील धान्यावरील किडींचे व्यवस्थापन (भाग दोन )

विविध हंगामांत कडधान्य, तृणधान्ये व गळीतधान्य पिके घेतली जातात. आपण चांगले उत्पादन घेत असलो तरी काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाकडे आपले दुर्लक्ष असते. नवीन धान्याची एकाच वेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्य तीन ते चार महिने साठवण करून, अपेक्षित बाजारभाव असताना बाजारात आणल्यास चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते.धान्य साठवणीच्या काळात धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीपासून साठवणीच्या धान्याचे संरक्षणार्थ उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते.

धान्य साठवणुकीच्या पद्धती 

1) पक्की सिमेंट व पत्र्याची बांधलेली कोठी : अशा प्रकारच्या कोठ्यांमध्ये किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे खर्चात बचत होते. बियाणे व बाहेरील हवामान यांचा संपर्क कमी येतो. बियाणे ठेवण्यास आणि काढण्यास अत्यंत सोपे जाते. 2) कच्च्या मातीने तयार केलेली कोठी किंवा मातीची वाडगी: महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागामध्ये मुख्यत : अशा प्रकारचे कोठी बियाणे साठवणुकीसाठी वापरली जातात. या प्रकारात पावसाळ्यात मातीची वाडगी ओलावा धरून ठेवतात. त्यामुळे किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. 3) बांबूची शेणाने सारवलेली कणगी : अशा प्रकारामध्ये बांबूमध्ये तयार केलेल्या कोठ्या वापरतात. त्या जास्त करून आदिवासी भागामध्ये दिसून येतात. पावसाळ्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.

4) तागाची पोती वापरणे : तागाची पोती किंवा गोणी बियाणे साठवण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र वापरली जातात. ह्या प्रकारामध्ये किडींचा प्रादुर्भाव पावसाळ्यात दिसून येतो. 5) प्लास्टिकपासून तयार केलेल्या पिशव्या :ही पद्धत राष्ट्रीय भात संशोधन संस्था, कटक, ओरिसा यांनी शोधून काढली आहे या प्रकारात 50 किलोपर्यंत बियाणे साठवता येते. या प्रकारात किडींचा प्रादुर्भाव होत नाही. 6) प्लास्टिक धाग्यापासून तयार केलेली पोती :सध्या अशा प्रकारच्या पिशव्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात, परंतु यामध्ये बियाणे जास्त काळासाठी साठवून ठेवता येत नाही. अशा प्रकारच्या पिशव्यांमध्ये किडींचा व उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होतो.

धान्यातील ओलावा व कुबट वास 

पावसाळ्यात बियाणाला पाणी लागल्याने ओलावा निर्माण होतो. अशा प्रकारचे बियाणे सडल्यामुळे त्यास कुबट वास येतो व बियांची नासाडी होऊन नुकसान होते. कीड व बुरशींना ओलाव्यामुळे वाढीस चालना मिळते. किडींचा जीवनक्रम अंडी – अळी-कोष-पतंग अशा प्रकारांत होतो. यामध्ये अळी अवस्थेत कीड जास्त प्रमाणात नुकसान करते.

बियाणे साठवणुकीमध्ये सापडणार्या प्रमुख किडी, पतंग, उंदीर, बुरशी खालीलप्रमाणे

अ) सोंडे किडे : तारुण्य आणि अळी अवस्था जास्त करून बियाणांचे नुकसान करते. मादी जास्त करून ज्या बीमध्ये खाते तिथेच अंडी घालते. नंतर त्या अंड्याचे पूर्ण किड्यांमध्ये रूपांतर होईपर्यंत ती बियांमध्येच राहते आणि नुकसान करते. ह्या किडीचे जीवनचक्र 35 दिवसांत पूर्ण होते. यासाठी पोषक तापमान 28 अंश से. आणि आर्द्रता 70 टक्के असल्यास किडे झपाट्याने वाढतात.

ब) पतंग : हे बियाणाजवळ अंडी घालतात. पांढर्या रंगाच्या अळ्या बीला होल पाडतात आणि आतील भाग खातात. तरुण अवस्थेत आल्यावर बीतील आतील भाग खाऊन कडेचे आवरण तसेच ठेवतात. नंतर त्या आवरणाच्या आत ते कोष तयार करतात. पतंग अवस्थेत आल्यावर बाहेरील आवरण तोडून ते बाहेर येतात. नंतर वरच्या भागातील बियाणे ते खातात. त्या खोलवर साठवलेल्या बियाणात जात नाहीत.

क) बियाणे पोखरणारे किडे / अळी : जास्त करून अंडी बियाणामध्ये घालतात. अळ्या बियाणामध्ये शिरतात आणि तिथेच वाढतात आणि बियांची झालेली पावडर ते खातात, जी पावडर तरुण किड्यांनी तयार केलेली असते. या किडीच्या प्रजननवाढीसाठी तापमान 34 अंश सें. पोषक असते. आर्द्रता 60 ते 70 टक्के लागते. मादी तिच्या आयुष्यकाळात 300 ते 500 अंडी घालते.

ख) पिठातील लाल किडे आणि अळी : हे किडे व अळ्या प्रामुख्याने पिठावर आणि फुटलेल्या बियाणावर गुजराण करतात. न फुटलेले बियाणे ते खात नाहीत. ह्या किडीमुळे साठवणुकीत दुर्गंध येतो. प्रजननासाठी आवश्‍यक तापमान 35 अंश सें., आर्द्रता 75 टक्के लागते. मादी 20 दिवसांच्या आयुष्यचक्रमात 500 अंडी घालते.

ग) उंदीर – पावसाळ्यात शेतातील उंदरांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते जवळील घरे, गोडाऊन आणि निवार्याच्या ठिकाणी आश्रय घेतात. उंदरांचे प्रजनन खूप जलदगतीने होते. नर-मादीच्या एका जोडीपासून वर्षभरात 80 उंदरांची पैदास होते. जन्मानंतर 10 दिवसांनी उंदराला तीक्ष्ण दात येतात. दर महिन्याला त्याची लांबी 1/2 सें.मी ने वाढते. मादी तर दोन महिन्यांनी पिल्ले देते. प्रत्येक वेळी ती सहा ते दहा पिल्लांना जन्म देते. गर्भधारणेचा काळ 20 ते 28 दिवसांचा असतो. मादी एका वर्षात पाच ते सहा वेळा विते. ही पिल्ले दीड ते दोन महिन्यांत वयात येतात.

घ) बुरशीजन्य रोग : पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यानंतर बुरशीची वाढ जास्त प्रमाणात दिसून येते. ऍस्पिर्जिलस व पेनिसिलियम या प्रकारातील बुरशी जास्त करून बियाणे साठवणीच्या ठिकाणी आढळते. फुटलेले बियाणे बुरशीला लगेच बळी पडते. यामुळे बुरशीची वाढ जास्त प्रमाणात होते. पांढर्या रंगाच्या जाळ्या बियाणामध्ये दिसून येतात. बियाणे काळपट दिसते. अशा प्रकारच्या बियाणाची उगवणक्षमता खूप कमी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)