सागरी ऊर्जा

 विज्ञानविश्‍व

 मेघश्री दळवी

खनिज इंधन संपत चालल्याने इतर अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांकडे आता आपण आपोआप वळतोय. गेली दहा वर्षे सौर ऊर्जा, बायोमासपासून ऊर्जा, पवनऊर्जा यांच्यावर भर देतो आहोत. तसाच अलीकडला एक महत्त्वाचा ऊर्जास्रोत आहे सागरी ऊर्जा. समुद्राच्या लाटा आणि भरती-ओहोटी यात पाण्याची जी वेगाने हालचाल होते, त्याचा वापर करून विद्युतजनित्र फिरवले जाते आणि विद्युतऊर्जा मिळते. ही सागरी ऊर्जा. ऊर्जानिर्मितीचा हा मार्ग सोयीचा आणि स्वच्छ आहे. त्यात आवाज, पाणी यांच्या प्रदूषणाचा धोका नाही. तसंच आपण निसर्गात काही ढवळाढवळ करत नसल्याने याचा तोटा कोणताही नाही. समुद्राचं पाणी आपल्याला प्रचंड प्रमाणात उपलब्ध असल्याने अशा ऊर्जानिर्मितीला खीळ कधीही बसणार नाही. ही जनित्रं लहान असल्याने देखभालसुद्धा सोपी पडते.

सगळ्या खंडांना उत्तम किनारे लाभले असले तरी त्यातली काही ठराविक किनारेच सागरी ऊर्जेसाठी उपयोगी पडतात. मुख्यत: भरपूर उंच खळाळत्या लाटा आणि तिथे यंत्रणा उभारण्यासाठी सोय अशा जागीच सागरी ऊर्जा मिळवणं शक्‍य होतं. ऑस्ट्रेलियाला सुदैवाने असे किनारे मिळाले आहेत. त्यामुळे तिथे बऱ्यापैकी प्रमाणात सागरी ऊर्जा मिळवली जाते. पाइक रिसर्च ही कंपनी अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर संशोधन करते. तिच्या मते, सागरी ऊर्जेसाठी दक्षिण कोरियाचा किनारा सर्वोत्तम आहे. आणि तो देश याचा फायदा करून घेत साडेसहाशे मेगावॅट विद्युतशक्‍ती दरवर्षी निर्माण करतो.जगातलं सर्वात मोठं भरती-ओहोटीचं ऊर्जाकेंद्र दक्षिण कोरियात आहे.

चीनमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा लगेच वापर करण्याकडे कल आहे. आज तिथे वर्षाला सत्तर गिगावॅट विद्युतशक्‍ती लाटा आणि भरती-ओहोटीतून मिळवली जाते. हायड्रोइलेक्‍ट्रिक विद्युतकेंद्र उभारण्यासाठी नद्यांवर धरण बांधणे, तिथल्या विस्थापितांना योग्य जागा मिळवून देणं किंवा अशा केंद्रांची देखभाल करणं ही सर्व खर्चिक आणि वेळखाऊ कामं असल्याने त्याऐवजी सागरी ऊर्जा वापरणं जास्त फायदेशीर ठरतं. तेव्हा चीन आणखी काही असे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिटन हे बेट असल्याने तिथेही अशा ऊर्जानिर्मितीला भरपूर वाव आहे. हळूहळू तिथे हा ऊर्जास्रोत गंभीरपणे घेतला जातोय आणि नव्या प्रकल्पांवर काम सुरू केलं जातंय. फ्रान्समध्येही असे बरेच प्रकल्प आहेत. जगातला सर्वात मोठा लाटांपासून ऊर्जा मिळवण्याचा प्रकल्प स्वीडनमध्ये आहे. काही युरोपीय देशांना असे उपयुक्‍त किनारे नसल्याने तिथे मात्र अशी ऊर्जा मिळवणे शक्‍य होत नाही.

कॅनडा हा सागरी ऊर्जा मिळवणारा एक मुख्य उत्तर अमेरिकन देश. विशेषत: उत्तर भागात भरपूर लाटा आदळणारे किनारे तिथे आहेत. त्यामुळे लाटा आणि भरती-ओहोटीमधून कॅनडा वर्षाला चाळीस मेगावॅट विद्युतशक्‍ती मिळवतो.  भारताला साडेसात हजार किलोमीटर लांबीचा किनारा आहे. त्यातून एकूण साठ गिगावॅट सागरी विद्युतशक्‍ती मिळवता येईल. मात्र आपल्याकडे हा स्रोत अजून खूप नवा आहे. लाटा आणि भरती-ओहोटी हे तितकेसे नियमित नसल्याने त्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा सौर ऊर्जा आपल्याला काही ठिकाणी जास्त सोयीची पडत आहे. पण ओदिशा, पश्‍चिम बंगाल, आणि कच्छ इथे अशी सागरी ऊर्जा खात्रीने मिळवत येईल. फक्‍त ती आर्थिकदृष्ट्‌या फायदेशीर करण्याकरता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
23 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)