साखर कारखाने जोमात अन्‌ साखर शाळा कोमात !

ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित शाळाबाह्य मुलांचा प्रश्‍न पुन्हा आला ऐरणीवर

गणेश घाडगे/नेवासे: जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमात सुरू झाला आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतील मजूर आपल्या कुटुंबासह ऊसतोड काम करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात आले आहेत. मात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या साखर शाळा बंद पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित असून, पुन्हा शाळाबाह्य मुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

विविध साखर कारखान्यांच्या परिसरात बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड, धुळे यासह अन्य जिल्ह्यांतील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जिल्ह्याबरोबर नेवासे तालुक्‍यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माळराने ऊसतोड मजुरांच्या राहुट्या व कोप्यांनी गजबजून गेली आहेत. अनेक ऊसतोड मजुरांची मुले 3 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत. महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये शासनाने साखर शाळा सुरु केल्या होत्या. एकही मूल कुपोषित राहू नये, तसेच शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी बालहक्क कायद्यानुसार जास्तीत जास्त मुले शिक्षणच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी साखर कारखाना स्थळावर शाळेसाठी तात्पुरते शेड इमारतीची व्यवस्था केली होती.

दरवर्षी ऊसतोड मजुरांची मुले-मुली या साखर शाळांत शिक्षण घेत होती. मात्र जिल्ह्याबरोबर नेवासे तालुक्‍यात सध्या तरी कोणत्याच साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकही साखर शाळा सुरू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड कामगारांची मुले शालाबाह्य आहेत. साखर शाळा सुरू करण्यासाठी मजुरांनीही कारखाना व्यवस्थापनाकडे वेळोवेळी गाऱ्हाणे मांडले. मात्र कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली दिसत नाही, हिच परिस्थिती जिल्ह्यातील, तसेच तालुक्‍यातील ज्ञानेश्‍वर, मुळा व गंगामाई, वृद्धेश्‍वर यासह सर्वच कारखाना स्थळांवर पहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांची मुलेही आता उसाच्या फडातच धडे गिरवू लागली आहेत. त्यांची पहाटेपासूनच आई-वडिलांबरोबर भटकंती सुरु असते. त्यामुळे शासनाने यावर योग्य तोडगा काढून साखर कारखाना कार्यस्थळावर पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शासन एकीकडे शाळा बाह्य मुला-मुलींसाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र तरीही ऊसतोड मजुरांची मुले-मुली आजही उसाच्याच फडात खेळताना दिसून येत आहेत. या मुलांच्या भटकंतीमुळे अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मात्र खालावली आहे. त्यामुळे या मुलांच्या भवितव्यासाठी शासनाने पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

ऊसतोडणी कामगारांची मुले लहानपणीच उसाच्या फडात रमली, तर ती कधीच शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत नाहीत. त्यामुळे या मुलांना देखील शिक्षणाची गोडी लागावी, अशी योजना शिक्षण विभागाने आणावी.
– मुकुंद अभंगी, अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)