साखर कारखानदारांच्या समस्यांवर उपायासाठी विशेष समिती नेमणार

मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई – राज्यातील साखर उद्योगांच्या समस्यासंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तीप्रदत्त समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

साखर कारखानदारांच्या समस्यासंदर्भात तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांसंदर्भात आज विधानमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. साखरेचे दर, अतिरिक्त उत्पादनामुळे होणारी अडचण, एफआरपीचा दर, ऊस क्षेत्रात झालेली वाढ आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले, साखर कारखानदारांच्या व उद्योगांच्या समस्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून या संदर्भात उपाय सुचविण्यासाठी सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी साखर संघ, खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधींसह विविध विभागाचे सचिव यांचा समावेश केला जाईल. ही समिती तातडीने कारखानदारांच्या समस्यासंदर्भात उपाय सुचविणार आहे, असे ते म्हणाले.

माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी साखर कारखानदारांच्या समस्यासंदर्भात माहिती दिली. सहकार मंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मधुकरराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सर्वश्री राजेश टोपे, हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)