साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र आघाडीवर

उत्तरप्रदेश पिछाडीवर : 15 मेपर्यंत गाळप चालण्याचा अंदाज

पुणे, दि. 25 – यंदाच्या हंगामात देशात सर्वाधिक साखरनिर्मिती महाराष्ट्रातून होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मार्चच्या मध्यापर्यंत राज्यात तब्बल 93.83 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. इतर राज्यांच्या मानाने हे प्रमाण सर्वाधिक असल्याने यंदा महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर राहणार आहे.
साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तरप्रदेश ही राज्ये महत्त्वाची मानली जातात. देशाच्या एकूण उत्पादनापैकी किमान 70 टक्के साखर उत्पादन या तीन राज्यांतूनच होते. हंगाम सुरू होण्याआधी तीन महिन्यांपर्यंत देशात पावसाअभावी उसाची स्थिती खूपच बिकट होती. परंतु, हंगाम सुरू होण्याअगोदर एक महिना देशात सर्वत्र विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊसक्षेत्र दुपटीने वाढल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मार्च अखेरपर्यंतही सुरू आहे. साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार यंदाचा गाळप हंगाम हा 15 मेपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. साखरेच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशला सुद्धा महाराष्ट्राने यंदा मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशात यंदा 84.39 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. तेथील अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम संपलेला आहे. कर्नाटकात आतापर्यत 35.10 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हा दोन्ही राज्यांची आकडेवारी पाहता, महाराष्ट्रात विक्रमी म्हणजे 93.83 लाख मेट्रिक टन साखरचे उत्पादन झाले आहे. अजूनही गाळप हंगाम सुरू असल्याने हे उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे.
———–
राज्यनिहाय साखर कारखाने
देशात यंदा 523 साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला होता. मार्चअखेर 105 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला आहे. बंद झालेल्या कारखान्यांमध्ये महाराष्ट्र- 31, कर्नाटक- 48, उत्तरप्रदेश- 5, तामिळनाडू- 7, आंध्रप्रदेश आणि अन्य राज्यांतील 7 कारखाने बंद झाले आहेत.

निर्यात वाढण्याची गरज
गेल्या हंगामात 40 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. हा दबाव झुगारण्यासाठी यातील किमान 20 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात होणे गरजेचे आहे. तर पुढील हंगामात निर्माण होणारी 40 ते 50 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली, तरच साखर उद्योगाची घडी पुढील काही महिन्यांत नीट बसू शकेल, असा साखरतज्ज्ञांचा अंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)