साकोरे येथे नरभक्षक बिबट्या जेरबंद

file photo

सहा वर्षांच्या चिमुकलीला केले होते ठार

मंचर- साकोरे (ता. आंबेगाव) येथे नरभक्षक बिबट्याने सहा वर्षांच्या चिमुकलीला ठार केल्यानंतर अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद वनखात्याला सोमवारी (दि. 25) पहाटे यश आले आहे.

रविवारी (दि. 24) सायंकाळी सहाच्या सुमारास श्रुतिका महेंद्र थिटे (रा. जऊळके, ता. खेड) या चिमुरडीला बिबट्याने मक्‍याच्या शेतात झडप घालून उचलून नेवून ठार केले होते. परिसरात घडलेली घटना ही अतिशय हृदयद्रावक होती. चिमुरडी आपले मामा अंकुश कडुसकर यांच्या येथे पाच दिवसांपूर्वी आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. साकोरे गावातील गाडेपट्टी येथील वस्तीवर असलेल्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याचे अधिकारी सोमनाथ खुंटे, राजेंद्र गाढवे, कोंडीभाऊ डोके यांनी पिंजरा तेथे लावला होता.

पिंजऱ्यामध्ये सावज म्हणून शेळी ठेवण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला. ही घटना परिसरात कळल्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. साकोरे परिसरात बिबट्याने हल्ला करुन बालिकेला ठार करण्याची पहिलीच घटना घडली असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात बिबट्या बऱ्याच दिवसांपासून धुमाकूळ घालत होता. उसाचे आणि मक्‍याचे क्षेत्र जास्त असल्यामुळे आणखी बिबटे असण्याची शक्‍यता आहे.

  • बिबट्या नरभक्षक नसल्याचा अंदाज
    साकोरे वस्तीवरील नागरिक बिबट्यांच्या भीतीने भयभीत झाले होते. पकडलेला बिबट्या माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान पकडलेला बिबट्या लहान आकाराचा असून तो नरभक्षक नसावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)