साकोरेतील दोन शेतकऱ्यांचा कांदा चोरला

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील साकोरे येथील शेतकरी बबन नामदेव लोहोटे आणि तुळशिराम रामजी गाडे या दोन शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी झाली आहे. सुमारे 42 हजार रूपयांचा कांदा चोरीला गेल्याची फिर्याद अज्ञात चोरट्याच्या विरोधात शनिवारी दुपारी मंचर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
साकोरे येथील शेतकरी तुळशिराम रामजी गाडे यांची कांद्याची बराकी रस्त्याच्या कडेला आहे. बराकीच्या दरवाजाबाहेर दोन कांद्याच्या गोणी भरून पडलेल्या होत्या. शेतकरी तुळशिराम यांची पत्नी सुमन हिने पती तुळशिराम यांना आवाज देऊन सांगितले की, कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरीच्या उद्देशाने अंदाजे 25 कांद्याच्या गोणी चोरून नेल्या आहेत. ही घटना बुधवार (दि. 9) सायंकाळी 5 वाजता किंवा त्यानंतर गुरूवारी (दि. 10) सकाळी साडेसहा या दरम्यान घडली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात कांदा चोरीचा गुन्हा दाखल केला असून सुमारे 35 हजार रूपयांचा कांदा चोरीला गेला आहे. दुसरे शेतकरी बबन नामदेव लोहोटे यांनी बुधवारी (दि. 9) कांदा पिशव्या भरून बराकीच्या बाहेर ठेवल्या होत्या. त्यावेळी शेतकरी बंडू तुळशिराम गाडे यांनी बबन लोहोटे यांना तुम्ही ठेवलेल्या कांद्याच्या पिशव्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे सांगितले. सुमारे सहा कांद्याच्या पिशव्या, प्रत्येकी पिशवीचे अंदाजे वजन 50 किलो याप्रमाणे एकूण 7 हजार रूपयांचा कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. अशा एकूण 31 कांद्याच्या पिशव्या चोरीला गेल्या आहेत. सुमारे 42 हजार रूपयांचा कांदा चोरीला गेल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. कांदा चोरीचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे सुधाकर जाधव करीत आहेत. कांद्याचे कडाडलेले बाजारभाव पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीच्या ठिकाणी लक्ष द्यावे. त्यामुळे कांद्याच्या होणाऱ्या चोऱ्या टळण्यास मदत होईल. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कांद्याला बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांनी कांदा चोरीला जाऊ नये यासाठी दक्ष रहावे, असे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)